'सर्व धर्मिय अभिवादन दिंडी'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

'सर्व धर्मिय अभिवादन दिंडी'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: नाना पेठ, भवानी पेठ परिसरात आगळ्या ' सर्व धर्मिय अभिवादन दिंडी'ने शुक्रवारी जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले. सूफी वादन आणि गायनाची जोड असलेल्या या दिंडीत 'ज्ञानोबा... तुकाराम...'चा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांच्या सोबतीने मुस्लिम, बौद्ध, शीख धर्मगुरूंनी मानवता हाच संतांनी सांगितलेला खरा धर्म आहे, असा संदेश दिला.

संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या हजारो भाविकांनी ही दिंडी डोळ्यांमध्ये सामावून घेतली. ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री निवडुंगा विठोबा मंदिर ते रिझवानी मस्जिद यादरम्यान या दिंडीची छायाचित्रे टिपण्यासाठी हात उंचावत होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सर्व जात धर्म पंथाची वारी लोक सहभागी झाले होते.

शिवमहोत्सव समिती, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळ, रिझवानी मस्जिद, शिवमहोत्सव समिती, दि मुस्लिम को ऑप बॅंक, सुफी वारकरी विचारमंच, पी.ए. इनामदार विद्यापीठ व समविचारी संस्थांच्या वतीने या सर्वधर्मीय 'अभिवादन दिंडी'चे आयोजन केले होते. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि संविधान यांच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

हभ.प. विकास लवांडे यांच्यासह ख्रिश्चन धर्मगुरू फादर डॉ. अविनाश वाघमारे, बौद्ध धर्मगुरु भंते हर्षवर्धन, सूफी वारकरी मंचचे उमर शरीफ आदींसह सर्वधर्मीय नागरिक दिंडीत सहभागी झाले होते. नाना पेठेतील साखळीपीर तालमीपासून 'अभिवादन दिंडी' सुरू झाली. पारशी अग्यारी, निवडुंगा विठोबा मंदिरमार्गे धान्य बाजार, पानसरे धर्मशाळा, गूळ आळी, बुरूड पूल तेथून अंगरशा बाबा दर्गामार्गे श्रमदान मारुती, गंज पेठ येथे रिझवानी मशिदीजवळ दिंडीची सांगता झाली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुस्लिम पदार्थ व्हेज बिर्याणी, शिरकुर्मा यांचा प्रसाद देण्यात आला.

 विकास लवांडे यांनी यावेळी सांगितले की भेदाभेद अमंगळ, या रे या सारे जण, असे संतांनी सांगून ठेवले आहे. तरीही आज समाजात भेद पाडण्याचे काम काही लोक करत आहेत. मात्र असे लोक वारकरी नाहीत हे आपण लक्षात घ्यायला हवे. समाजात दरी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे.

डॉ. अविनाश वाघमारे यांनी या उपक्रमाला धन्यवाद देताना सांगितले की वैद्यकीय पेशात आम्ही रुग्ण वाचवण्यासाठी लागणारे रक्त कोणाचे आहे हे विचारत नाही. जोपर्यंत आम्ही माणूस होत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य समजणार नाही. सत्य कोणी सांगू लागले की ते आजकाल पटत नाही. महाराष्ट्राला चांगुलपणाचा वारसा आहे, तो अशा कार्यक्रमांतून पुढे नेऊ.

भंते हर्षवर्धन यांनी सांगितले की सर्वधर्मसमभावाचे, संविधानाच्या प्रसारासाठीचे हे खरे कार्य आहे. तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावरुन चालणारा कल्याण मित्र म्हणजे रविंद्र माळवदकर आहेत.

उमर शरीफ म्हणाले '' माळवदकर यांच्या वैचारिक तालमीत आम्ही घडतो आहोत. महाराष्ट्रापुढे एकात्मतेचा संदेश ते देत आहेत. त्यांना सर्व समाजाने ताकद दिली पाहिजे.''

रविंद्र माळवदकर यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या सर्व धर्मिय अभिवादन दिंडी मागील भूमिका स्पष्ट केली. दरवर्षी या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

वर्क चॅरिटेबल ट्रस्टचे महंमद आवैस यांनीही शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवती शाखेच्या शिवानी माळवदकर आणि युवा नेते शिवराज माळवदकर यांनी संयोजन केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.