बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा
पुणे : महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅब विषयी रेट कार्ड जाहीर झालेले आहे. ७ ते ८ महिने होऊन सुद्धा या जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार ओला, उबर व तत्सम एप्लीकेशन वर आधारित कंपन्यांनी दर अमलात आणले नाहीत. हे दरपत्रक पुणे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक अॅप कंपन्यांना लागू करण्यात यावेत आणि पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सवारी कॅब, गोजो कॅब, टॅक्सी बाजार, कॅब बाजार, इन ड्राईव्ह, ब्ला ब्ला कार्स, वनवे कॅब, रॅपिडो, ई - कॅब, एव्हरेस्ट फ्लीट या बेकायदेशीर चालू असलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वर्षा शिंदे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष सदाशिव हुडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश काटकर, उपाध्यक्ष सचिन कापरे, सचिव बालाजी भांगे, सल्लागार अर्जुन फुंदे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष नाथाभाऊ फुंदे, सचिव दीपक गायकवाड, सल्लागार राहुल रोहमारे, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा मोठे आदी उपस्थित होते.
वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या, पुणे जिल्ह्यामध्ये वाकड नाशिक फाटा, चांदणी चौक, पुणे स्टेशन, नवले ब्रिज अशा ठिकाणी मुंबई पुणे प्रवासासाठी अवैधरित्या प्रवासी वाहतूक बेकायदेशीरपणे चालत आहे. प्रवासी एप्लीकेशन वर आधारित कंपन्या यांच्या आधारे ही वाहतूक केली जात आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
एव्हरेस्ट फ्लीट सारख्या बलाढ्य कंपन्या पुण्यामध्ये तीन ते चार हजार गाड्या घेऊन आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे गरीब कष्टकरी चालक आणि मालक यांना उदरनिर्वाह करणे देखील अशक्य झाले आहे. तरीही या विषयांमध्ये प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी आम्ही संस्थेमार्फत करीत आहोत.
मागील वर्षी दिनांक ९ सप्टेंबर २०२३ पासून पुणे जिल्हा प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणीही आमची दखल घेतली नाही. त्यामुळे ४ सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही ९ हजार कॅब चालक-मालक स्वत:च्या कॅब घेऊन मुंबई मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहोत. काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असेही वर्षा शिंदे पाटील यांनी यावेळी सांगितले.
* *सीएनजी चे दर वाढले तरी देखील गाडी भाडे तेवढेच*
ड्रायव्हर हा एक दुर्लक्षित घटक आहे. सन २०१४ ला सीएनजी चा दर हा ४३ रुपये होता आणि गाडी भाडे हे ९ ते १० रुपये किलोमीटर होते. आज २०२४ मध्ये सीएनजी चा दर ९९ रुपये आहे. तरी देखील गाडी भाडे हे ९ ते १० रुपये किलोमीटर आहे. बाजारामध्ये वस्तूंचे दर वाढत आहेत. मात्र, चालक-मालकांच्या गाडीभाड्यामध्ये कधीच वाढ होत नाही. यांच्याकडे सरकारचे का दुर्लक्ष होत आहे ? हे या देशाचे नागरिक नाहीत का ? असा प्रश्नही वर्षा शिंदे पाटील यांनी उपस्थित केला.
Comments
Post a Comment