प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणार ‘वक्तृत्वाचा जागर’


प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणार ‘वक्तृत्वाचा जागर’
 
पुणे : आपल्या अमोघ आणि चिंतनशील वक्तृत्वाने महाराष्ट्रातील पाच पिढ्यांचे मन आणि कान तयार करणारे ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला १५ जुलैपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘वक्तृत्वाचा जागर’ करण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य भोसले यांचे चरित्रकार, लेखक-वक्ते आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 
प्रा. जोशी म्हणाले, “प्राचार्य भोसले यांचे वक्तृत्व हे मराठी वक्तृत्वाचा मानबिंदू आहे. महाराष्ट्राचे समाजमानस घडविण्याचे काम त्यांच्या विचारसंपन्न वक्तृत्वाने केले. लौकिक अर्थाने त्यांचे स्मारक निर्माण करण्याऐवजी पुढच्या पिढीत उत्तम वक्ते निर्माण व्हावेत हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. यासाठी जन्मशताब्दी वर्षात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते त्यामुळे वाचिक अभिव्यक्तीचे गांभीर्य समजावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 
जन्मशताब्दी वर्षातील विविध उपक्रम –
• येत्या १५ जुलै रोजी सायंकाळी ४.४५ वाजता पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात प्राचार्य भोसलेप्रेमींचा स्नेहमेळावा आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान प्रदान केला जाणार.
• १५ जुलै हा प्राचार्य भोसले यांचा जन्मदिन ‘वक्तृत्व दिन’ म्हणून साजरा व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.
• राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व विषयक कार्यशाळांचे आयोजन, शाळांमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या साहित्याचे वाचन.
• महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले करंडक’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
• जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आणि बृह्न्महाराष्ट्रात ही प्राचार्य भोसले यांच्यावरील व्याख्यानाचे आणि त्यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे कार्यक्रम होणार.
• महाराष्ट्रातील वक्त्यांची आणि व्याख्यानमालांची सूची तयार करणार.
• विश्व मराठी परिषदेच्या वतीने ऑनलाईन ‘बारोमास व्याख्यानमालेचे आयोजन’ करण्यात येणार असून वर्षभर चालणाऱ्या या व्याख्यान मालेत नामवंताच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचा घरबसल्या श्रोत्यांना आनंद घेता येणार.
• प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या दुर्मिळ व्याख्यानांचा अनमोल ठेवा, संस्मरणीय कार्यक्रम रसिकांसाठी यु-टूबवर उपलब्ध करून देणार.
• प्राचार्य भोसले यांच्या कर्तृत्वाला आणि श्रोत्यांच्या आठवणींना उजाळा देणारा स्मृतीग्रंथ प्रकाशित करणार.
• प्राचार्य भोसले यांच्या फलटणच्या घरावर निलफलक लावणार आणि फलटणमध्ये त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांना मिळालेली स्मृतिचिन्हे आणि सन्मानपत्र यांचे स्मृतिदालन साकारणार.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.