पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी १६ मोफत सेवांचा शुभारंभ; माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या हस्ते उद्घाटनकष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी १६ मोफत सेवांचा शुभारंभ; माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन
कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला.
पुणे (१० जुलै २०२६)
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच संत रोहिदास महाराज दिंडीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बाबा सामाजिक फाउंडेशन आणि सहयोगी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत १६ विविध मोफत सेवांचे उद्घाटन आज माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज दिनांक १० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दारूवाला पूल येथील संत देवजी बाबा मंदिरासमोर झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे (माऊली) यांनी भूषविले.
या उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ. बाबा कांबळे (माऊली) म्हणाले की, आमचे कार्यकर्ते अत्यंत समर्पित भावनेने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. सध्या ही सेवा पिंपरी-चिंचवडपासून पुणे सासवडपर्यंत कार्यान्वित असून, आगामी काळात ती पंढरपूरपर्यंत विस्तारित करण्याचा आमचा मानस आहे. या सेवेत सहभागी होण्यासाठी मी जास्तीत जास्त रिक्षा चालकांना आवाहन करतो.
माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांनी या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, महाराष्ट्र रिक्षा पंचायत गेली अनेक वर्षे वारकऱ्यांच्या सेवेचे व्रत जपून आहे. ही खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.
*वारकऱ्यांसाठी उपलब्ध १६ मोफत सेवा:*
या उपक्रमांतर्गत मोफत रिक्षा सेवा, बॅग-बूट-चप्पल दुरुस्ती व पॉलिश, चरण सेवा (मालिश), फळवाटप, अन्नदान, चहा-बिस्किट वाटप, शुद्ध पिण्याचे पाणी, भाजीपाला पुरवठा, औषधोपचार, प्रथमोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्य केंद्र आणि मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा १६ सुविधा भाविकांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
*प्रमुख उपस्थिती:*
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे पाटील, प्रवक्ते धनंजय कुदळे, विशाल ससाने, भाऊसाहेब शेलार, दिंडी क्र. २४ चे विश्वस्त नारायण कोकाटे, ह.भ.प. संदीपान महाराज घायाळ यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे, प्रवीण शिखरे, निशांत भोंडवे, अंथोनी फ्रान्सिस, आनंद वायदंडे, अमीर हमजा, गणेश कांबळे, अल्लाबकस शेख, राजू शेख,फिरोज सेनागो, मौलाभाई शेख, मल्लेश भंडारी, गणेश कांबळे, रमेश इंगळे, साद खान, विल्सन म्हस्के,
यांनी केले. कार्यक्रमात डॉ. बाबा कांबळे आणि रवींद्र धिंगेकर यांचा पगडी घालून विशेष सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment