विश्व हिंदू परिषदेची वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘आरोग्यवारी’**विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने तीन पालखी मार्गांवर मोफत वैद्यकीय सेवा*
*विश्व हिंदू परिषदेची वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘आरोग्यवारी’*
*विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने तीन पालखी मार्गांवर मोफत वैद्यकीय सेवा*
पुणे : विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीच्या वाटेवर निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताने सेवाभावाची पालखी उचलली आहे. आषाढी वारीतील तीन पालखी मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि पाच रुग्णवाहिकांसह मोफत वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने आषाढी वारीच्या तीन मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा गेले ३९ वर्षे पुरवली जात आहे . या आषाढी वारी आरोग्यसेवेचा शुभारंभ भवानी पेठेतील पालखी विठोबा चौक येथे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष संजय भोसले, वि.हि.प. क्षेत्र धार्मिक पुंज प्रमुख संजय मुरदाळे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहसेवा प्रमुख डॉ. शर्वरी यरगट्टीकर, आरोग्य सेवा प्रमुख पुजारी काका बाळासाहेब वाघ,विभाग मंत्री संतोष अंगोळकर,केतन घोडके , यशवंत देशपांडे,गोडबोले काका,जिल्हा मंत्री शैलेंद्र जाधव ,नितीन महाजन, नाना क्षीरसागर,आरती भारती,संजय गोडबोले,निखिल कुलकर्णी,शुभम मुळूक, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या आरोग्य सेवा पथकाबरोबर ७ रुग्णवाहिका,२५ डॉक्टर्स, १५ नर्सेस, २० सेवाभावी कार्यकर्ते सेवा देणार आहेत.
हेमंत रासने म्हणाले, संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून दिलेला विश्वशांतीचा संदेश आजच्या युद्धजन्य जागतिक परिस्थितीत अधिकच समर्पक ठरत आहे. भारताला अशा आव्हानात्मक काळात अध्यात्माचीच शक्ती दिशा आणि बळ देऊ शकते. माऊलींनी विश्वाला दिलेल्या अध्यात्माच्या विचारांची आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
संजय भोसले म्हणाले, पंढरपूरची वारी म्हणजे पुणेकरांना सेवा करण्याची मोठी संधी. जेव्हा आमच्या खाण्यात विठ्ठल येतो तेव्हा त्याचा महाप्रसाद होतो. जेव्हा माणसात देव येतो तेव्हा त्याचा संत होतो. जेव्हा तो गाण्यात येतो तेव्हा त्याचे भजन होते. जेव्हा तो चालण्यात येतो तेव्हा त्याची वारी होते. हिंदू धर्मातील भक्तीचे मोठे उदाहरण वारीत दिसते. आज जगाची जी दशा झाली आहे, त्याला दिशा देण्याचे काम आपला हिंदू धर्म करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
किशोर चव्हाण म्हणाले, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्यावतीने गेल्या ३९ वर्षांपासून आषाढी वारीच्या मार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते. ही सेवा अखंड व अविरत सुरू आहे. लाखो भाविक या सेवेचा लाभ घेत असतात. या पावसात वारीमध्ये चालणाऱ्या विणेकऱ्यांना छत्री आणि वारकऱ्यांना रेनकोट वितरण करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संजय मुरदाळे व डॉ. शर्वरी यरगट्टीकर यांनी देखील मार्गदर्शन केले.
संजय मुरदाळे म्हणाले, एक पंढरीची वारी केली तर सर्व तीर्थांचे पुण्य मिळते. या वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हे विश्व हिंदू परिषद कर्तव्य भाव म्हणून करते. ही सेवा विश्व हिंदू परिषदेच्या विविध प्रांतातून होत असते. विणेकरी वारकरी यांना रेनकोट घालता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या छत्रींची सोय त्याचबरोबर इतर वारकऱ्यांना रेनकोट आणि या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आरोग्य सेवा दिली जाते.
Comments
Post a Comment