जगद्गुरू तुकोबा हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार : मुकुंद दातार मसाप आयोजित कार्यक्रमात प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्काराने दीपक फडणीस यांचा गौरव


जगद्गुरू तुकोबा हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार : मुकुंद दातार

 

मसाप आयोजित कार्यक्रमात प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्काराने दीपक फडणीस यांचा गौरव

 

पुणे : वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समन्वयाचे संस्कार देणारे संत तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार आहेत, म्हणूनच ते जगद्गुरू आहेत आणि जगभरात इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ते पोहोचले पाहिजेत. तसा उत्तम प्रयत्न दीपक फडणीस यांनी केला आहे, असे उद्गार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक मुकुंद दातार यांनी शनिवारी येथे काढले.

 

डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार दीपक फडणीस यांना डिव्हाईन व्हर्सेस अभंगगाथा (संत तुकाराम महाराजांच्या ५२ लोकप्रिय अभंगांचे इंग्रजी रूपांतर) या ग्रंथासाठी मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण होते. मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, डॉ. गोखले यांच्या कन्या डॉ. आनंदिनी क्षीरसागर, स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी, माधव राजगुरू हेही उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला. सन्मानपत्र आणि सात हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

मुकुंद दातार म्हणाले, तुकोबांचे वर्णन करायचे तर ते ज्ञानदेवांचे पाईक, नामदेवांचे कृपांकित आणि एकनाथांचे मानसपुत्र आहेत. मराठी जनांसाठी तुका म्हणे, हा जणु सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यांनी नामसंकीर्तनाला लोकसंग्रहाची जोड दिली. संन्यासाश्रम न स्वीकारता, अनासक्तीचा मात्र आग्रह धरला, उत्कट भावनांचा आत्मनिष्ठ आविष्कार आपल्या कवित्वातून घडवला आणि भक्तीला नीतीची जोड दिली. मध्ययुगीन कालखंडात जलदिव्यातून पार पडलेल्या स्वतःच्या कवित्वाची तुकोबांइतकी प्रखर जाणीव प्राचीन – अर्वाचीन कुणाहीकडे दिसत नाही. तुकोबांच्या रूपाने खरोखरीच कवित्वाचा कळस गाठला गेला, असे म्हणता येते. फडणीस यांनी आधुनिक काळात तुकोबांचे हे लोकविलक्षण कवित्व इंग्रजी भाषेतून जगभर पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

 

मनोगत मांडताना फडणीस यांनी हा पुरस्कार म्हणजे नम्र करणारा भावपूर्ण क्षण असून, माझ्यासाठी आनंदाचा उत्सव आहे, अशी भावना व्यक्त केली. वारकरी तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेणाऱ्या सोनोपंत दांडेकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार म्हणजे सोनियाचा दिनु आहे, असेही ते म्हणाले. तुकोबांचे कालातीत विचार जगभर पोहोचावेत, ही भावनाच या अनुवादामागे आहे. अतिशय गहन, सखोल तत्त्वज्ञान आणि अध्यात्म सोप्या भाषेत सांगून, भक्तीचा निर्मळ प्रवाह वाहता ठेवणारे तुकोबा इंग्रजीत आल्याशिवाय जगद्गुरू कसे होणार, याची जाणीव झाल्याने या कामाची सुरवात झाली आणि त्यांची कृपा म्हणूनच अनुवादाचे हे कार्य पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. समाजाला तुकोबांची नितांत गरज आहे. त्यामुळे संगीत, चित्र, संशोधन, डिजिटल माध्यमे, अनुवाद प्रत्येक माध्यमातून तुकोबा जगभरात नेण्याची आवश्यकता आहे. तुकोबांवर लघुपट करत असून, नव्या वाटांनी तुकोबांचा शोध घेतला जावो, वेगळ्या वाटा सापडोत आणि नवे अभ्यासक, संशोधक जगद्गुरुंच्या कालातीत संदेशाचे वाहक होवोत, एवढीच प्रार्थना आहे.

 

अध्यक्षीय समारोपात सोमण यांनी त्यांच्या आनंदडोह या सादरीकरणाचे अनुभव कथन केले. फडणीस यांचा १५ खंडांचा अभंगगाथेच्या अनुवादाचा संकल्प लवकरच पूर्णत्वास जावो, असे ते म्हणाले.

 

डॉ. आनंदिनी क्षीरसागर यांनीही मनोगत मांडले. प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविक केले. सुनेत्रा मंकणी यांनी सूत्रसंचालन केले तर माधव राजगुरू यांनी आभार मानले.

 

 

फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) डॉ. स्वाती महाळंक, योगेश सोमण, मुकुंद दातार, दीपक फडणीस, डॉ. आनंदिनी क्षीरसागर, सुनेत्रा मंकणी.

प्रति,

मा. संपादक

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार दीपक फडणीस यांच्या संत तुकाराम महाराज यांच्या ५२ लोकप्रिय अभंगांच्या ‘डिव्हाईन व्हर्सेस अभंग गाथा’ या इंग्रजी रूपांतरीत ग्रंथास देण्यात आज (दि. ११) देण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.

डॉ. स्वाती महाळंक, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.