शुभम आव्हाळे ठरला 'साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६'चा विजेता*- शाई प्रतिष्ठान आयोजित महाकाव्य स्पर्धेत शब्दांची बरसात; मिलिंद चन्ने 'रंगकेसरी नाट्यगौरव पुरस्कार २०२६' प्रदान

*शुभम आव्हाळे ठरला 'साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६'चा विजेता*
- शाई प्रतिष्ठान आयोजित महाकाव्य स्पर्धेत शब्दांची बरसात; मिलिंद चन्ने 'रंगकेसरी नाट्यगौरव पुरस्कार २०२६' प्रदान

पुणे : शाई प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय 'साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६' ही मानाची काव्यस्पर्धा नुकतीच नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे उत्साहात पार पडली. राज्यभरातील २१५ कवींपैकी निवड झालेल्या ५४ कवींनी अंतिम फेरीत आपल्या कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये पुण्याच्या शुभम आव्हाळे यांच्या 'पावसा येऊन जा' या कवितेने प्रथम क्रमांक पटकावत यंदाचा 'साहित्य केसरी महाकाव्य करंडक' पटकाविला, अशी माहिती शाई प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख निखील सुक्रे यांनी दिली.

कुस्तीतील 'महाराष्ट्र केसरी'च्या धर्तीवर काव्यक्षेत्रात मानाचे स्थान मिळविलेल्या या स्पर्धेचे यंदाचे सलग चौथे वर्ष होते. 'इथे फक्त कविता जिंकते' या घोषवाक्याखाली झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवींनी सामाजिक, भावनिक आणि समकालीन विषयांवरील कविता सादर केल्या.या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद चन्ने यांना 'रंगकेसरी नाट्यगौरव पुरस्कार २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले.

स्पर्धेत सांगलीच्या भाग्यलक्ष्मी बाळू क्षिरसागर यांनी 'आई तुझंच नाव लावावं म्हणते' या कवितेसह द्वितीय, तर वर्ध्याच्या प्रीती वानखेडे यांनी 'तुळस' या कवितेसह तृतीय क्रमांक मिळविला. यवतमाळचे निलेश तुरके (तुझी याद) आणि संभाजीनगरचे संदीप भिंगीकर (व्याकुळ प्रजा) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. गडचिरोलीच्या शरावती किशोर यांच्या 'यशोधरा' या कवितेला विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाला, तर नांदेडचे मंगेश कवटीकवार यांना 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे, प्रसिद्ध व्याख्याते स्वप्नील चौधरी, प्रा. अमोल चीने, कवी सागर काकडे, लेखक शरद तांदळे, युवा वक्ते अक्षय इळके, व्याख्याते ज्ञानराज पांचाळ आणि उद्योगपती नागेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

'साहित्यकेसरी' हा केवळ पुरस्कार नसून कवीच्या प्रतिभेचा सन्मान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंतांना हे व्यासपीठ प्रेरणा देत आहे, असे विनायक पवार यांनी नमूद केले. साहित्य माणसाला संवेदनशील बनवते. अशा स्पर्धांमधून उद्याचे सक्षम कवी आणि लेखक घडतील, असा विश्वास शरद तांदळे यांनी व्यक्त केला.

हनुमंत चांदगुडे म्हणाले, "अशा प्रकारच्या साहित्यिक उपक्रमांमधून समाजात विचारांची पेरणी होते." स्वप्नील चौधरी यांनी, "कविता ही केवळ भावना व्यक्त करण्याचे माध्यम नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे प्रभावी साधन आहे," असे मत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.