शिवभूपाल’मधील बंदिशी अतिशय सक्षम : तालयोगी पंडित सुरेश तळवलकरहोनराज मावळे लिखित ‘शिवभूपाल’ बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन
‘शिवभूपाल’मधील बंदिशी अतिशय सक्षम : तालयोगी पंडित सुरेश तळवलकर
होनराज मावळे लिखित ‘शिवभूपाल’ बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : बंदिश हे संगीताचे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मूर्ततेकडून अमूर्ततेकडे जाण्याचा मार्ग आहे. बंदिशींमधील मुखडा हा त्यांची ओळख कायम ठेवतो कारण मुखड्यामध्ये सम असते. होनराज मावळे यांनी रचलेल्या ‘शिवभूपाल’मधील बंदिशी अतिशय सक्षम आहेत. शिवचरित्र आणि संगीत असे दोन्ही विषय त्यांनी बंदिशींच्या माध्यमातून अतिशय समर्थपणे पेलले आहेत. या बंदिशी गायकाला गाता येणाऱ्या, विस्तार मांडता येणाऱ्या आहेत, हे त्याचे वैशिष्ट्य आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी काढले.
‘सृजनसभा पब्लिकेशन’तर्फे रचनाकार होनराज मावळे लिखित व रचित छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनप्रसंगांवर आधारित ‘शिवभूपाल’ या राग-तालबद्ध शास्त्रोक्त बंदिशींच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. ११) पंडित तळवलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम, संगीततज्ज्ञ डॉ. केशवचैतन्य कुंटे, सृजनसभेच्या मुख्य प्रशासक अक्षदा इनामदार मंचावर होते.
तालयोगी पंडित सुरेश तळवलकर पुढे म्हणाले, तालाचे स्वरूप आज क्षीण झाले आहे. हल्ली मात्रा वाजविल्या जातात, कारण तालाचा अर्थ समजणे फार कठीण आहे. तालाच्या खंडातून आकृती बनते आणि त्या आकृतीचा कालांतराने छंद तयार होतो. त्यामुळे संगीत क्षेत्रात तालाचा छंद आणि रागाची धून होणे आवश्यक आहे. होनराज मावळे यांनी रचलेल्या बंदिशी उच्च दर्जाच्या असून त्यात कुठेही अट्टाहास, कृत्रिमता किंवा लेपण दिसून येत नाही. त्यांमध्ये राग अतिशय चांगल्या रितीने ओवलेला असून बंदिशी तालाच्या खंडाला चिकटून जात आहेत, असे जाणवते.
मुकुंद संगोराम म्हणाले, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात ज्या राजाबद्दल कमालीचा आदर आहे, अशा निर्दोष राजा शिवछत्रपती यांच्या चरित्रावर आधारित होनराज मावळे यांनी रचलेल्या बंदिशी अतिशय उत्तम असून त्यामागे खोलवर अभ्यास असल्याचे दिसून येते. त्यांच्या बंदिशींमध्ये उत्तम विश्रांतीस्थळे सापडत असल्याने गायकाला बंदिशींचा विस्तार करणे सोपे जाईल.
डॉ. केशवचैतन्य कुंटे म्हणाले, होनराज मावळे यांनी रचलेल्या बंदिशी या अंत:स्फूर्तीतून साकारलेल्या जाणवतात. अनेक बुजुर्ग बंदिशकार, कलाकार आणि पारंपरिक रचना यांचे प्रतिबिंब या बंदिशींमध्ये आढळते. गुरूने पेरलेले बीज, त्यातून उगमास आलेले रोप आणि त्याला लागणारी फळे याचे समाधान मला होनराज मावळे यांच्या कार्यातून मिळाले आहे.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, होनराज मावळे यांनी शिवभूपालच्या माध्यमातून शिवभक्तीचा वारसा आणि शिवरायांच्या भक्तीची पूजा साकारली आहे.
लेखनाविषयी बोलताना होनराज मावळे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र शास्त्रोक्त संगीताच्या बंदिशींमधून सादर करणे असा आगळा वेगळा विचार असणारा 'शिवभूपाल' हा बंदिशसंग्रह आहे. विविध राग-तालांमध्ये निबद्ध असणाऱ्या या रचना विस्तारक्षम असून साहित्यिकदृष्ट्याही सकस आहेत. यातील बऱ्याच रचना नृत्यसंरचनेसाठीही अनुकूल आहेत.
सुरुवातीस सृजनगणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अनुजा जोशी यांनी सृजनगान सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती जोशी यांनी केले. मान्यवरांचा सत्कार होनराज मावळे, अक्षदा इनामदार, इतिहास अभ्यासक विक्रमसिंह मोहिते, ह. भ. प. उद्धवबुवा जावडेकर यांनी केला.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर ‘शिवभूपाल’मधील बंदिशींचे प्रभावी सादरीकरण मेहेर परळीकर यांनी केले. तर केदार टिकेकर (तबला), श्रेया ऐगळीकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
Comments
Post a Comment