महात्मा ज्योतीराव फुले यांचा ‘अखंड’द्वारे जातीव्यवस्था मोडण्याचाच संदेश : डॉ. सदानंद मोरेसंवाद पुणेतर्फे ‘सत्यशोधक महात्मा’ नाटकाच्या बोधचिन्हाचे अनावरण
महात्मा ज्योतीराव फुले यांचा ‘अखंड’द्वारे जातीव्यवस्था मोडण्याचाच संदेश : डॉ. सदानंद मोरे
संवाद पुणेतर्फे ‘सत्यशोधक महात्मा’ नाटकाच्या बोधचिन्हाचे अनावरण
पुणे : महात्मा फुले यांच्या जीवनावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा प्रभाव जाणवतो. समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांनी ‘अखंड’ हे माध्यम निवडले. अखंड म्हणजे अभंगच. तुकाराम महाराज आणि महात्मा फुले यांनी जातीव्यवस्था मोडली पाहिजे असाच संदेश दिला आहे. फुले यांचे कार्य दृश्य स्वरूपात, कलात्मक पद्धतीने समाजापुढे येत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
महात्मा जोतिराव फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त संवाद पुणेतर्फे महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक महात्मा’ या नाटकाची निर्मिती करण्यात येत आहे. या नाटकाचा मुहूर्त नाटकातील काही भागांचे अभिवाचन आणि बोधचिन्हाचे अनावरण करून आज (दि. ७) झाला. त्या वेळी डॉ. मोरे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, माजी आमदार कमलताई ढोलेपाटील, गौरी राहुल ढोलेपाटील, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, डॉ. रवी चौधरी व्यासपीठावर होते. नाटकाचे लेखन रामनाथ चव्हाण यांचे असून रंगआवृत्ती, दिग्दर्शन व नेपथ्य योगेश सोमण यांचे आहे. निकिता मोघे यांची निर्मिती असून डॉ. रवी चौधरी, केतकी महाजन निर्मिती सहाय्यक आहेत.
डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले, समाजाकडून कटू अनुभव आल्यानंतर फुले यांनी जातीव्यवस्थेचा विचार सुरू केला आणि जातीअंतासाठी प्रयत्न सुरू केले.
योगेश सोमण म्हणाले, महात्मा फुले हे बहुआयामी व्यक्तीमत्त्व आहे. त्यांचे कार्य नाट्यकृतीच्या माध्यमातून समाजापुढे, विशेषत: तरुणांपुढे नेता येणार आहे. ‘अखंड’द्वारे त्यांचे विचार प्रसंगानुरूप मांडण्यात येणार आहेत.
गौरी ढोलेपाटील म्हणाल्या, समाजाच्या जागृतीसाठी महात्मा फुले यांनी जे विचार मांडले ते नाटकाच्या माध्यमातून पुढे न्यायचे आहेत. त्यांनी मानवतेसाठी केलेला संघर्ष समाजासमोर नेणे अपेक्षित आहे.
कमलताई ढोलेपाटील म्हणाल्या, महापुरुषांनी समाजासाठी काय केले हे आपण वाचतो परंतु ते पुढच्या पिढीपर्यंत नेत नाही. त्यामुळे युवा पिढीला महापुरुषांचे विचार समाजतच नाही.
‘सत्यशोधक महात्मा’ हे नाटक ऑगस्टमध्ये रंगमंचावर येणार असल्याचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले. शिक्षण संस्थांमध्ये नाटकाचे प्रयोग आयोजित करून महात्मा फुले यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, असे डॉ. रवी चौधरी यांनी सांगितले.
सुरुवातीस ‘सत्यशोधक महात्मा’ या नाटकातील काही प्रसंगांचे अभिवाचन अरुंधती कामठे, ऋग्वेद सोमण, रोहित ताराहार, गायत्री वाडकर यांनी केले.
Comments
Post a Comment