पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता याला विजेतेपदाचा मानअश्वथ एस बनला भारताचा 98वा ग्रँडमास्टर पुण्याच्या अद्विक अगरवालला आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा दुसरा नॉर्म
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता याला विजेतेपदाचा मान
अश्वथ एस बनला भारताचा 98वा ग्रँडमास्टर
पुण्याच्या अद्विक अगरवालला आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा दुसरा नॉर्म
पुणे, 8 जुलै 2026: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीने आणि ‘द हॅबिटॅट’द्वारे प्रायोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकित ग्रँड मास्टर भारताच्या अभिजीत गुप्ता याने 7.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वथ एस याने 7गुणांसह दुसरा क्रमांक, तसेच अखेरच्या तिसऱ्या नॉर्म सह ग्रँड मास्टर किताब पटकावला. तो भारताचा आता पर्यंतचा 98वा ग्रँड मास्टर ठरला. भारताच्या ग्रँड मास्टर कुशाग्र मोहनने 6.5गुणांसह तिसऱ्या क्रमांकाची निश्चिती केली. तर, पुण्याचा फिडे मास्टर अद्विक अगरवाल याने 5गुणांसह आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा दुसरा नॉर्म पटकावला.
मुंडवा येथे ‘द फेर्न हॅबिटॅट’ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन नवव्या फेरीत अव्वल मानांकित ग्रँड मास्टर भारताच्या अभिजीत गुप्ताने श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय मास्टर डिसिल्वा एलएमएसटीवर निर्णायक विजय मिळवला. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वथ एस याने अमेरिकेच्या फिडे मास्टर वैद्यनाथन कन्नन चा पराभव केला. तिसऱ्या लढतीत भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर अक्षय बोरगावकर याने भारताच्या नितीश बेलुरकरवर मात केली.
नवव्या फेरीतील उत्कंठावर्धक लढतीत अश्वथ एस याने किंग्ज इंडियन डिफेन्स प्रकारच्या बचावाने डावाची सुरुवात केली. तत्पूर्वी कन्नन याने डी4 ही चाल करत डावाला प्रारंभ केला. त्यानंतर अश्वथने घोड्याची आक्रमक चाल करताना एक नजरचुक केली. त्यामुळे त्याची स्थिती खूपच बिघडली होती. मात्र, त्याने झुंजार खेळ करत डाव लांबवण्यात यश मिळवले. डावाच्या अखेरीस अश्वथने पुन्हा एकदा केलेल्या चुकीचा फायदा कन्नन याला घेता आला नाही. यावेळी मात्र अश्वथने कोणतीही चूक न करता विजयाची नोंद केली आणि ग्रँड मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केले.
यावेळी अश्वथ म्हणाला की, आज नवव्या फेरीत मी विजय मिळवला असला, तरी माझा या स्पर्धेतील आवडता डाव पहिल्या फेरीतील डिसिल्वावरचा विजय हा होता. हा संपूर्ण डाव अतिशय वेगवान आणि फसव्या चालींचा होता. 17व्या चालीत एक अभिनव आक्रमक चाल करताना मी डिसिल्वाला पराभूत केले. ही संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे आयोजित केली होती त्याबद्दल बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे विशेष कौतुक केले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय मास्टर पदाचा नॉर्म मिळवणारा अद्विक अगरवाल यावेळी म्हणाला की, या नॉर्मसाठी मला आज केवळ बरोबरी पुरेशी होती. त्यामुळे मी कोणताही धोका पत्करला नाही. माझा प्रतिस्पर्धी कुशाग्र मोहन आज साधारणपणे चारोकान किंवा फ्रेंच बचावाचा वापर करतो. त्यामुळे मी त्यासाठी तयारी ठेवली होती. डावाच्या उत्तरार्धात कुशाग्रने वर्चस्व मिळवले होते. परंतु मी उत्कृष्ट बचाव करून डाव अनिर्णित राखण्यात यश मिळवले. या दर्जेदार स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना परदेशी प्रवास न करता घरच्या स्पर्धेत विविध नॉर्म मिळवण्याची संधी मिळाली. संयोजकांनी ही अतिशय उत्कृष्ट नियोजन करून भारतीय खेळाडूंनाही संधी उपलब्ध करून दिली. अशाच प्रकारे आणखी स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 1लाख रुपये, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 75,000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय अद्विक अगरवाल याला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवल्याबद्दल 25,000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक भारताच्या ऐतिहासिक ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेत्या पुरुष संघाचे कर्णधार ग्रँड मास्टर श्रीनाथ नारायणन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॅबिटॅटचे मालक बलराज घई, एमसीएचे सचिव निरंजन गोडबोले, सह सचिव सतीश ठाकूर, आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर, चीफ आरबीटर आर श्रीवत्सन, डेप्युटी चीफ आरबीटर आयए अथर्व गोडबोले आणि आयए दिप्ती शिदोरे आदी उपस्थित होते.
निकाल: राउंड रॉबिन नववी फेरी:
अद्विक अगरवाल(0.5गुण)(भारत) बरोबरी वि.कुशाग्र मोहन(0.5गुण)(भारत);
अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज(0.5गुण)(बेलारूस)बरोबरी वि.फेडरोव्ह अलेक्सी(0.5गुण)(बेलारूस);
अक्षय बोरगावकर(1गुण)(भारत) वि.वि. नितीश बेलुरकर(0गुण)(भारत);
वैद्यनाथन कन्नन(0गुण)(अमेरिका)पराभूत वि. अश्वथ एस(1गुण)(भारत);
Comments
Post a Comment