भारतातील टाइप 2 मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलतेचे प्रमाण अधिक असल्याचे नव्या अभ्यासातून स्पष्ट
भारतातील टाइप 2 मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलतेचे प्रमाण अधिक असल्याचे नव्या अभ्यासातून स्पष्ट
पुणे, 3 जुलै 2026 : टाइप 2 मधुमेह असलेल्या जवळपास दोन तृतीयांश पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी) म्हणजेच लैंगिक दुर्बलतेचा त्रास असल्याचे पुणे येथील फ्रीडम फ्रॉम डायबेटीस क्लिनिकच्या संशोधकांनी केलेल्या अलीकडील अभ्यासात आढळून आले. त्यासाठी मधुमेहाच्या उपचारात रक्तातील साखर नियंत्रणाबरोबरच लैंगिक आणि मानसिक आरोग्याची नियमित तपासणी आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे.
‘प्रीवेलन्स ॲन्ड रिस्क फॅक्टर्स ऑफ इरेक्टाइल डिसफंक्शन इन मेन विथ टाईप 2 डायबेटिस इन रिअल-वर्ल्ड क्लिनिकल प्रॅक्टिस‘ नामक हा संशोधन अभ्यास 5 ते 8 जून 2026 दरम्यान अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे आयोजित अमेरिकन डायबेटीस असोसिएशन (एडीए) च्या 86 व्या वैज्ञानिक सत्रांमध्येे सादर करण्यात आला. या संशोधनाचा सारांश एडीएच्या अधिकृत डायबेटिस या नियतकालिकातही प्रकाशित झाला आहे.
या अभ्यासात फ्रीडम फ्रॉम डायबेटीस क्लिनिकमध्ये उपचार घेणाऱ्या 25 वर्षे व त्यावरील वयोगटातील 473 पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये इतर सहव्याधी असलेल्या रुग्णांना वगळण्यात आले होते. मात्र, या संशोधनात प्रत्यक्ष दैनंदिन वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांचा समावेश करण्यात आल्याने मधुमेहाच्या दैनंदिन उपचारांचे अधिक वास्तववादी परिस्थिती मांडणारी माहिती मिळाली.
हा अभ्यास डॉ. प्रमोद त्रिपाठी, डॉ.ए.व्यवहारे, डॉ.एन.एस.कदम, डॉ.बी.शर्मा, डॉ.डी.तिवारी, डॉ.टी.आर.काथ्रीकोल्ली, डॉ.एम.गानला आणि डॉ. बंशी साबू यांनी केला.
या अभ्यासातील निष्कर्षानुसार 64 टक्के सहभागी पुरुषांमध्ये सौम्य ते गंभीर अशा विविध स्तरांतील इरेक्टाइल डिसफंक्शन आढळला. 35.9 टक्के पुरुषांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती, तर जवळपास एक तृतीयांश पुरुषांना सौम्य स्वरूपातील इरेक्टाइल डिसफंक्शन होते. सुमारे 32 टक्के पुरुषांमध्ये मध्यम ते गंभीर स्वरूपातील समस्या दिसून आली.
या अभ्यासात सहभागी रुग्णांमध्ये इतर आरोग्यविषयक समस्यांचेही प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. 43 टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब, 46 टक्के रुग्णांना रक्तातील चरबीचे असंतुलन (डिस्लिपिडेमिया), 38 टक्के रुग्णांना दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार, तर 8 टक्के रुग्णांना न्यूरोपॅथीचा त्रास होता. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही देखील समस्या या सामान्य आहेत. या अभ्यासातील जवळपास निम्म्या सहभागींमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आली, तर 40 टक्क्यांहून अधिक जणांमध्ये चिंताग्रस्त असल्याची लक्षणे आढळली.
बहुविविध विश्लेषणाद्वारे संशोधकांनी इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी तीन स्वतंत्र जोखीमीचे घटक ओळखले. त्यामध्ये वाढते वय, नैराश्य आणि इन्सुलिनसह तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या मधुमेहावरील औषधांचा एकत्रित उपचार यांचा समावेश होता. नैराश्य असलेल्या पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता दुपटीहून अधिक असल्याचे दिसून आले. तसेच इन्सुलिन आणि तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या हायपोग्लायसेमिक औषधांचा एकत्रित उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्येही इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे दिसून आले.
संशोधकांच्या मते, इरेक्टाइल डिसफंक्शन हा केवळ जीवनमानावर परिणाम करणारा विकार नसून, तो टाइप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या चयापचयाशी आणि मानसिक आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा सूचक ठरू शकतो.
या संशोधनातून मधुमेह व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांची नियमित तपासणी समाविष्ट करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. या समस्यांची वेळेवर ओळख आणि योग्य उपचार केल्यास रुग्णांचे एकूण आरोग्य, उपचारांमधील सातत्य आणि दीर्घकालीन आरोग्य परिणाम अधिक चांगले होऊ शकतात.
संशोधकांच्या मते, रक्तातील साखरेचे नियंत्रण, मानसिक आरोग्य आणि लैंगिक आरोग्य या तिन्ही बाबींचा समावेश असलेला सर्वसमावेशक मधुमेह व्यवस्थापनाचा दृष्टिकोन स्वीकारल्यास रुग्णसेवेची गुणवत्ता आणि रुग्णांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते.
Comments
Post a Comment