पुण्यात 19 ते 21 जुलैदरम्यान 241 वा श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी आराधना महोत्सव.
पुण्यात 19 ते 21 जुलैदरम्यान 241 वा श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी आराधना महोत्सव.
पुणे : सदाशिव पेठ येथील नंजनगूड श्री वरदेंद्र राघवेंद्र स्वामी मठात पूज्य श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 241 व्या आराधना महोत्सवाचे आयोजन 19 ते 21 जुलै 2026 या कालावधीत अत्यंत भक्तिमय, वैदिक आणि धार्मिक वातावरणात करण्यात आले आहे. या पवित्र महोत्सवासाठी महाराष्ट्रासह देशभरातून हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हा महोत्सव परमपूज्य 108 श्री सुयतीन्द्र तीर्थ स्वामीजी यांच्या दिव्य आशीर्वादाने तसेच विद्यमान पीठाधीश्वर परमपूज्य 108 डॉ. श्री श्री श्री सुबुधेन्द्र तीर्थ स्वामीजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात 18 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता ध्वजारोहण, प्रार्थना उत्सव, गो-पूजन आणि धान्यपूजनाने होईल. त्यानंतर 19 जुलै रोजी पूर्व आराधना, 20 जुलै रोजी मध्य आराधना आणि 21 जुलै रोजी उत्तर आराधना असे विशेष धार्मिक विधी पार पडतील.
दररोज पहाटे 5.30 वाजता सुप्रभात सेवा, सकाळी 8.00 वाजता फलपंचामृत व अष्टोत्तर पारायण, 10.30 वाजता संस्थान पूजा, हस्तोदक व महामंगळआरती, दुपारी 1.00 वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेत हरिभजन व आध्यात्मिक प्रवचन, तसेच रात्री 8.00 वाजता उत्सव व अष्टावधान मंगलआरती आयोजित करण्यात येणार आहे.
महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. 19 जुलै रोजी बेंगळुरू येथील श्री आनंद तीर्थ यांचे कोलालू वाद्य सादरीकरण, 20 जुलै रोजी पुण्याचे पं. श्री रघुनंदन पानशीकर यांचे दासवाणी सादरीकरण, तर 21 जुलै रोजी श्रीमती नेहा देशपांडे कुलकर्णी यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन आयोजित करण्यात आले आहे.
याशिवाय रजत रथोत्सव 19 व 20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता, तसेच 21 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
मठाचे व्यवस्थापक श्री दत्ता जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, या तीन दिवसीय धार्मिक महोत्सवासाठी पुण्यासह विविध राज्यांतून हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्व भाविक, धर्मप्रेमी व नागरिकांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहून पूज्य संतांचे दर्शन, आशीर्वाद तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment