विद्यार्थीदशेत झोपू न देणारी स्वप्ने बाळगा : डॉ. अनिल दुधभातेदुधभाते ऑप्टोमेट्री कॉलेज व आदित्य फाउंडेशनतर्फे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थीदशेत झोपू न देणारी स्वप्ने बाळगा : डॉ. अनिल दुधभाते
दुधभाते ऑप्टोमेट्री कॉलेज व आदित्य फाउंडेशनतर्फे बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे, प्रतिनिधी : दुधभाते ऑप्टोमेट्री कॉलेज आणि आदित्य फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थीदशेत मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी झपाटून परिश्रम करण्याची प्रेरणा यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिटकॉन कंपनीचे संचालक डॉ. गणेश खामगळ होते. बन्सल क्लासेस, पुणेचे संचालक अभिषेक अवचार आणि प्रसिद्ध लेखिका प्रियंका चौधरी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुधभाते ऑप्टोमेट्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल दुधभाते यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल व डॉ. दुधभाते लिखित ‘नेत्रकोष’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. स्नेहल मानपुत्र यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया महामुनी हिने केले.
यावेळी अभिषेक अवचार आणि लेखिका प्रियंका चौधरी यांनी विद्यार्थ्यांना करिअर, ध्येय आणि यश याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. अनिल दुधभाते म्हणाले, "आपण झोपेत पाहतो ती स्वप्ने नसतात, तर जी स्वप्ने आपल्याला झोपू देत नाहीत, तीच खरी स्वप्ने असतात. ती पूर्ण करण्यासाठी झपाटून काम करा."
महाविद्यालयाच्या प्राध्यापिका काजोल माणिकपूरी यांनी सादरीकरणाद्वारे ऑप्टोमेट्री अभ्यासक्रम, त्यातील करिअरच्या संधी आणि या क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याची माहिती दिली. महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राजक्ता हिने दुधभाते ऑप्टोमेट्री कॉलेजमधील दर्जेदार शिक्षण, अनुभवी प्राध्यापक आणि आधुनिक सुविधांबाबतचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.
त्यानंतर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि ‘नेत्रकोष’ हे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गणेश खामगळ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र देताना सांगितले, "तुम्हाला जे आवडते ते प्रथम कागदावर लिहा. ते वारंवार वाचा, मनात रुजवा आणि त्यानुसार कृती करा. सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच ध्येय गाठता येते." त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमास डॉ. डिंपल दुधभाते, डॉ. वैशाली गोसावी, डॉ. शशांक घावटे, डॉ. गणेश दुधभाते, डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. वैशाली गोमसाळे, प्रियंका एडके, गणेश मोटे, साहित्यिक गिरीश वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. स्नेहल मानपुत्र, शीतल हिरळकर, गौरी निमकर, कोमल भोसले तसेच दुधभाते नेत्रालयाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभारप्रदर्शनानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment