पंडित सवाई गंधर्व यांच्या आठवणींना उजाळास्वरमयी गुरुकुलतर्फे किराना परंपरा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

पंडित सवाई गंधर्व यांच्या आठवणींना उजाळा

स्वरमयी गुरुकुलतर्फे किराना परंपरा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

पुणे : पंडित सवाई गंधर्व हे गायकीतील एक विद्यापीठ होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गुरू अब्दुल करीम खाँ यांनी सवाई गंधर्व यांना दिलेले गायनाचे धडे आणि पुढे गंधर्वांनी त्यावर घेतलेले कष्ट या सगळ्या प्रवासाला उजाळा देण्यात आला. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘किराना परंपरा’ या मालिकेतील आठव्या सत्राचे.

यानिमित्ताने पंडित सवाई गंधर्व यांच्या सांगीतिक योगदानावर रविवारी (दि. १०) विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी पंडित सवाई गंधर्व यांच्या गायकीची मर्मस्थळे उलगडून सांगितली. या वेळी सवाई गंधर्व यांची काही दुर्मिळ ध्वनिमुद्रणेही ऐकविण्यात आली, ती ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.

सवाई गंधर्व यांनी खाँ साहेबांचे गायन आत्मसात करतानाच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सवाई गंधर्व यांची गायकी अंतर्मुख आणि त्याचवेळी बहिर्मुख करणारी होती हे उदाहरणादाखल सांगण्यात आले. खाँ साहेबांच्या मते गंधर्वांचा आवाज अतिशय प्रतिकूल होता, मात्र त्यावर गुरू म्हणून खाँ साहेबांनी आणि स्वत: सवाई गंधर्व यांनी अपार कष्ट घेतले. आपल्या आवाजावर, सूरांवर १०-११ तासांचा रियाज करत प्रभुत्व मिळवले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या आवाजाची लय आणि ताल कसा सांभाळला हे डॉ. कुंटे यांनी सांगितले. प्रखर इच्छाशक्ती आणि चिवटपणा यांच्या जोरावर गंधर्वांनी आपली गायकी निर्माण केली. सुरुवातीला गणेशोत्सवातील कार्यक्रमांत, संगीत नाटकांत आणि मग विशेष मैफीली सादर करत त्यांनी आपल्या कलेने रसिकांना अनेक वर्ष मंत्रमुग्ध केले आणि अनेक शिष्य ही घडविले.

आवाज चांगला लागावा यासाठी सवाई गंधर्व मैफीलीच्या आधी ३ ते ४ तास रियाज करत असत. गंधर्वांचा सूर म्हणजे दैवी देणगी नव्हती तर प्रखर संगीत साधनेने आणि मेहनतीने त्यांनी आपला आवाज तयार केला होता. यावेळी सवाई गंधर्व यांच्या निवडक आणि अतिशय दुर्मिळ बंदिशी, ठुमरी ऐकविण्यात आल्या.

 

सवाई गंधर्व यांचे नातू डॉ. प्रभाकर देशपांडे आणि नातसून पद्मा देशपांडे, दुसऱ्या नातसून शीला देशपांडे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पद्मा देशपांडे यांनी सवाई गंधर्व यांच्या आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश