महाप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका : जगन्नाथ लडकत
महाप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका : जगन्नाथ लडकत
पूना गेस्ट हाऊसतर्फे 'अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई' विषयावर व्याख्यान
पुणे : महाप्रतापी, राजकारणधुरंधर अशा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व जागतिक पातळीवर अनेक योद्धे, सेनापती, इतिहासकारांनी वाखाणले आहे. जगातील दहा गाजलेल्या आणि महत्त्वपूर्ण लढायांमध्ये बाजीराव पेशवे यांच्या पालखेडच्या लढाईचा समावेश आहे. अनेक देशांच्या युद्धविषयक अभ्यासक्रमांत त्यांच्या लढायांचे दाखले दिले जातात. या पार्श्वभूमीवर, पराक्रमी व राजकारणकुशल बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका, असे आवाहन इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी केले.
पूना गेस्ट हाऊसच्या स्नेह मंचतर्फे बाजीराव पेशवे यांच्या २८६व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला (सोमवारी) 'अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई' विषयावर लडकत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. प्रशांत गोऱ्हे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, वीरमाता गौरी गोडबोले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, लेखक शिवप्रसाद मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.
लडकत म्हणाले, कोवळ्या वयात पेशवाईची धुरा पेललेल्या बाजीरावांनी अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई गमावली नाही. ४० पेक्षा अधिक युद्धे ते लढले आणि प्रत्येक लढाईत ते विजयी झाले. असा पराक्रम करणारा एकही योद्धा आजवर जगात झाला नाही. श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी रणभूमीवर तर शौर्य गाजवले, त्याचप्रमाणे ते राजकारणकुशलही होते. शत्रूची बित्तंबातमी नेमकी मिळवून, त्याच्या योजनांची दिशा, हालचाल हेरून, कमीतकमी सैन्यानिशी अतिशय वेगवान आणि गनिमी काव्याने युद्ध करण्यात ते कुशल होते. त्यांचे केवळ नाव ऐकताच शत्रू पळून जात असत, असा लौकिक त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवला होता.
पालखेडची अविस्मरणीय लढाई श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजाम यांच्यात लढली गेली आणि या लढाईत सैन्यबळ कमी असूनही अचूक व्यूहरचना, स्वतःला पूरक असे युद्धस्थळ निवडण्यातील चतुराई, शत्रूला युद्धाआधीच गनिमी काव्याने जेरीस आणण्याची कल्पकता, शत्रूची रसद आणि पाणी तोडण्याची चपळाई आणि अगतिक होऊन शरण आलेल्या शत्रूलाही माणुसकी दाखवण्याचे अतुलनीय धैर्य बाजीराव पेशवे यांच्याकडे होते, याचे दर्शन पालखेडच्या लढाईत घडते. आपल्या मुलखात घुसलेल्या शत्रूला हुसकावण्यासाठी थेट त्याच्या मुलखात घुसून प्रतिशह देण्याचा पराक्रम पेशवे यांनी केला. अनेक पटींनी जास्त असलेले सैन्य, अनुभवी सरदारांची फौज, प्रचंड तोफखाना, मुबलक पैसा आणि निजामासारखा कसलेला सैनापती असूनही तरुण वयाच्या बाजीराव पेशवे यांनी पालखेडच्या लढाईत निजामाला पराभूत करण्याची किमया केली. पेशवे यांचे वेगवान लष्करी डावपेच पाहून खुद्द निजामाने 'इसे खुदाने पैर नही पर दिये है', असे उद्गार काढल्याचे लडकत म्हणाले. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रचंड पराक्रमाचे कौतुक कऱण्यासाठी खुद्द छत्रपती शाहू महाराज सातारा सोडून सामोरे आले होते, असेही लडकत यांनी सांगितले.
प्रशांत गोऱ्हे म्हणाले, लवकरच पालखेड येथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारला जाणार आहे. तसेच एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पेशवे त्यांचे कर्तृत्व पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बाजीराव पेशवे यांनी शिवछत्रपतींच्या युद्धनीतीचा नेमका आविष्कार आपल्या कारकिर्दीत घडवला. होळकर, शिंदे, पवार, गायकवाड यांच्यासारखे पराक्रमी सरदार घडवले. त्यांचे पारंपरिक व्यवसाय सोडून त्यांना लढवय्ये केले. मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. तत्कालीन समाजरचनेत एका वेगळ्या पद्धतीचे सोशल इंजिनिअरिंग श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गायिका वैजू चांडवले, तसेच संजय मरळ व मयूर पांडे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. प्रथम तुला वंदितो, शूर आम्ही सरदार, वेडात मराठे वीर दौडले सात, बाजीराव पेशवे यांचा पोवाडा, राजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा आणि जयोस्तुते अशा गीतांचा त्यात समावेश होता.
Comments
Post a Comment