प्रशासकीय प्रवासाचा प्रेरणादायी दस्तऐवज; मोहन ठोंबरे यांच्या पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
प्रशासकीय प्रवासाचा प्रेरणादायी दस्तऐवज; मोहन ठोंबरे यांच्या पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
पिंपरी | प्रतिनिधी
७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुण्यात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या सेवेत तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी मोहन ठोंबरे (भा.प्र.से. निवृत्त) यांच्या ‘A Promise to Myself’ (इंग्रजी) आणि ‘एक वचन : स्वतःला दिलेले’ (मराठी) या दोन पुस्तकांचे प्रकाशन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बनठिया (भा.प्र.से. निवृत्त) आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते या पुस्तकांचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. दौलत देसाई व सुनील पाटील (माजी सनदी अधिकारी), मंदार पाटील (संचालक, पुढारी वृत्तपत्र), पूनम मेहता व सतीश राऊत (अतिरिक्त जिल्हाधिकारी) उपस्थित होते.
मोहन ठोंबरे यांनी उपजिल्हाधिकारी पदापासून भारतीय प्रशासकीय सेवेपर्यंतच्या प्रवासात अनेक संवेदनशील जबाबदाऱ्या पेलल्या आहेत. हे पुस्तक केवळ त्यांच्या आठवणींचा संग्रह नसून, शासनव्यवस्थेकडे 'मानवी मूल्यांवर आधारलेली जबाबदारी' म्हणून पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात निर्णय घेताना येणाऱ्या अडचणी. प्रशासकीय चौकटीत काम करताना येणारी आव्हाने आणि त्यातून काढलेले मार्ग. जनतेच्या अपेक्षा आणि सरकारी यंत्रणा यांचा साधलेला समतोल.
"हे पुस्तक केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीच नव्हे, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि सामाजिक कार्यात रस असलेल्या तरुण पिढीसाठी एक दीपस्तंभ ठरेल," असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. ही दोन्ही पुस्तके ए.पी.के. पब्लिशर्स एल.एल.पी., पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहेत. एका अनुभवी अधिकाऱ्याचा हा जीवनप्रवास प्रशासकीय कार्यपद्धती समजून घेणाऱ्यांसाठी मोलाचा ठेवा ठरणार आहे.
Comments
Post a Comment