तरुणांमध्ये सेवाभाव रुजवून विधायक मार्गावर नेणे गरजेचे*खासदार डॉ. मेधा कुलकर्णी : उदय जगताप यांना समर्थ प्रतिष्ठानतर्फे ‘समर्थ गौरव पुरस्कार’ प्रदान
*तरुणांमध्ये सेवाभाव रुजवून विधायक मार्गावर नेणे गरजेचे*
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी : उदय जगताप यांना समर्थ प्रतिष्ठानतर्फे ‘समर्थ गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे : सध्याच्या काळात तरुण अधिकाधिक भौतिक सुखाच्या मागे धावताना दिसत असताना, समर्थ प्रतिष्ठान सारखी संस्था तरुणांना एकत्र करून सामाजिक कार्यात सहभागी करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. समाजपरिवर्तनासाठी अशा संस्थांची नितांत गरज आहे. तरुणांमध्ये सेवाभाव रुजवून त्यांना विधायक मार्गावर नेणे अत्यावश्यक आहे, असे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
समर्थ प्रतिष्ठानच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल १६ वा समर्थ गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृह येथे प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रसेनजीत फडणवीस, शाहीर दादा पासलकर, भावार्थ देखणे, किरण साळी, भूषण पंड्या, पराग ठाकूर, विवेक खटावकर, प्रमोद आडकर, जोत्स्ना सरदेशपांडे, ॲड. प्रताप परदेशी आणि डॉ. मिलिंद भोई, वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत बहिरट, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, तसेच पीयुष शहा, नितीन पंडित, शिरीष मोहिते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते उपस्थित होते.
रुपये ११ हजार रोख, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी ७५ हजार रुपये, पुणे विद्यार्थी गृहाला ४१ हजार रुपये, हिरामण बनकर विद्यालयाला ४१ हजार रुपये आणि महाराष्ट्रीय मंडळाला १५ हजार रुपये अशी देणग्या देण्यात आल्या.
डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपला धर्म आपल्याला पंचमहाभूतांची पूजा करायला शिकवतो. पण आपण तो धर्म विसरत चाललो आहोत. त्यामुळेच पंचमहाभूते पुरासारख्या माध्यमांतून आपल्याला जाग आणत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी तरुणांना विधायक कार्यात गुंतवणे आवश्यक आहे.
उदय जगताप म्हणाले, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणे हे आव्हानात्मक असले तरी एक ध्येय ठेवून काम केल्यास समाज नक्कीच पाठीशी उभा राहतो. समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी हे कार्य यशस्वीपणे पार पाडू शकलो.
प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, गणेशोत्सव मंडळ जशी सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतात, तसेच समर्थ प्रतिष्ठान सारख्या ढोल-ताशा पथकांनीही सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. इतर पथकांनीही समर्थ प्रतिष्ठानचा आदर्श घ्यावा.
या कार्यक्रमात समर्थ प्रतिष्ठान चे हितचिंतक विकास कड आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लहू या गावातील १४० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. समर्थ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment