अस्सल मराठी लोककलांच्या जागरात रंगले 'द फोक आख्यान'*- नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांचे आयोजन; आयडियल काॅलनी मैदानावर अवतरली 'मऱ्हाटी' लोकपरंपरा

*अस्सल मराठी लोककलांच्या जागरात रंगले 'द फोक आख्यान'*
- नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांचे आयोजन; आयडियल काॅलनी मैदानावर अवतरली 'मऱ्हाटी' लोकपरंपरा

पुणे, ता. १६: महाराष्ट्राच्या कणाकणांत भरलेल्या, अस्सल मराठी मातीतल्या लोकपरंपरांचे अत्यंत जोशपूर्ण, प्रभावी आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण असलेले 'द फोक आख्यान' गुरुवारी रंगले. सुमारे अडीच तास, या कलाकारांनी रसिकांना लोककलाप्रकारांचे वैविध्य दाखवत मंत्रमुग्ध केलेच; ठेकाही धरायला लावला.

कोथरूड प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका हर्षाली दिनेष माथवड यांच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय 'कोथरूड सुरोत्सव २०२५'चे पहिले पुष्प फोक आख्यानातून गुंफले. आयडियल कॉलनी मैदानावर रंगलेल्या या लोकोत्सवावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, हर्षाली माथवड, दिनेश माथवड, मंजुश्री खर्डेकर, नीलेश कोंढाळकर, दुष्यंत मोहोळ, अंबादास अष्टेकर, अभिनेता रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

लोककलांचे पारंपरिक प्रकार द फोक आख्यानातून एकापाठोपाठ सादर होत गेले. रिवाजानुसार गणोबाला वंदन करून कलाकारांनी नऊ रात्रींच्या देवीच्या आख्यानाचा मंडप बांधला. नवखंड पृथ्वीचा खेळ मांडलेल्या कृष्णाचा शोध लौलिक पातळीवर घेणाऱ्यांना कोपरखळी मारत, धरतीची घोंगडी आणि आकाशाचा मंडप सजवलेल्या ठिकाणी मराठी मुलुखातून देवीचा छबिना, पलंगकथांच्या माळा गुंफत उत्तरोत्तर रंगत गेला. कलाकारांनी कमावलेले आवाज, पेहराव, रंगसंगती, वाद्याचे वैविध्य आणि वादकांचे कौशल्य यामध्ये रसिक रंगून गेले आणि 'द फोक आख्याना'च्या सादरीकरणाला कोथरूडकरांनी भरभरून दाद दिली.

टाळ, वीणा, पखवाज, मृदुंग, ढोलकी, डफ, दिमडी, संवादिनी, बासरी, झांज, तुणतुणे, ढोल अशा देशी वाद्यांचे सूर साथीला घेत कलाकारांनी महाराष्ट्राच्या लोककला परंपरांची अनुभूती दिली. ज्ञाना, तुका, मुक्ता, जना, नामा, एका पासून आधुनिक काळातील गाडगेबाबांपर्यंत सारी संतपरंपरा, शिवकाल, पेशवाई, स्वातंत्र्यचळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असे अनेक विषय वासुदेव, गोंधळी, कुडमुड्या, शाहीर, दशावतारी, बतावणी, बहुरूपी, पोतराज यांच्या माध्यमातून या आख्यानाने सहज सामावून घेतले होते.

चंद्रकांत पाटील यांनी भगव्या झेंड्याचे वादळ निर्माण करणाऱ्या थोरल्या धन्याला मानाचा मुजरा म्हणून शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा पोवाडा गाणाऱ्या शाहीर चंद्रकांत या कलाकाराला स्वतःच्या हातातील मनगटी घड्याळ भेट दिले.

मोनिका मोहोळ म्हणाल्या, दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कोथरूडमध्ये सुरोत्सवसारखा आगळावेगळा कार्यक्रम गेल्या चार वर्षांपासून हर्षाली माथवड घेत आहेत. मराठी लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा द फोक आख्यान आणि राहुल देशपांडे यांच्या बहारदार गायनाची मेजवानी कोथरूडकरांना अनुभवता येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत माथवड यांनी पूरग्रस्तांसाठी मदत, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

प्रास्ताविकात हर्षाली दिनेश माथवड म्हणाल्या, सुरोत्सवाच्या माध्यमातून पुण्याच्या आणि कोथरूडकरांच्या सांस्कृतिक अपेक्षांची पूर्तता करण्याचा हा प्रयत्न आहे. मोठ्या संख्येने या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या रसिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. हा महोत्सव यापुढेही फुलत राहावा आणि नागरिकांच्या सेवेची मला संधी मिळावी. रमेश परदेशी, दुष्यंत मोहोळ यांनीही मनोगते व्यक्त केली. पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा