तब्बल १ हजार १११ हून अधिक शंख वादकांनी एकत्र वादन करत केला विश्वविक्रम* एकाच वेळी एकाच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम ; वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद


*तब्बल १ हजार १११ हून अधिक शंख वादकांनी एकत्र वादन करत केला विश्वविक्रम* 
एकाच वेळी एकाच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम ; वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद

पुणे : पारंपरिक व अध्यात्मिक महत्त्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यात सात नादमय आवर्तनांद्वारे शंख वादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले. ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’ अशी सात आवर्तने आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करीत तब्बल १ हजार १११ हून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला. प्रत्यक्षात तब्बल १ हजार ४०० शंखवादक सहभागी झाले होते.

हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्व विक्रम सोहळा स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, जगदगुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, अतिरिक्त पोलीस महासंचालक आयपीएस कृष्ण प्रकाश, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ढोल पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, गायक अवधूत गांधी, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, किरण साळी, राजाराम मंडळ अध्यक्ष युवराज निंबाळकर, सनिकेत ग्रुप चे रवींद्र वाणी, अविनाश वाणी, निलेश पुरकर, बालाजी ग्रुपचे अनिल चितोडकर, नितीन चितोडकर, तसेच भूषण वाणी यांसह केशव शंखनाद पथकाचे संचालक रणजित हगवणे, संजय ठाकूर, काळूराम डोमले, सुहास मदनाल, प्रभाकर चव्हाण, शैलेंद्र भालेराव, शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी प्रमाणपत्र प्रदान केले.

प्रथम ‘ब्रह्मनाद’ या नादातून मानवी जीवन आणि परमात्मा यांच्यातील नात्याची आध्यात्मिक जोड दर्शवण्यात आली. त्यानंतर ‘सप्तखंड नाद’ व ‘अर्धवलय’ नादांचे सादरीकरण झाले. अर्धवलय नाद पृथ्वीच्या पाताळातील भागाचे प्रतिनिधित्व करतो. ‘तुतारी नाद’ या चौथ्या आवर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. पाचवे ‘पूर्णवलय’ व सहावे ‘सुदर्शन’ आवर्तनांनंतर, सातवे ‘मुक्तछंदनाद’ आवर्तन मुक्त नादाच्या रूपात सादर झाले. सातही नादांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सात खंड, पाताळातील अर्धा भाग आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन उपस्थितांना झाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जानेवारीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारी सुरू करा. अध्यात्मिक साधना हा समाधानाचा प्रकार आहे. शंखनाद करण्याने आध्यात्मिक साधना होते. शंखातून निर्माण होणारा ध्वनी ही एक साधना आहे

नितीन महाजन म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन ३७५ वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५१ वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकराचे ३०० वर्ष जयंती महात्मा जोतिबा फुले यांच्या १३५ पुण्यतिथी वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्ष सोहळा यानिमित्ताने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या विश्वविक्रमाची नोंद झाली. याकरिता मागील १ वर्षा पासून तयारी सुरु होती. शंखवादक पुणे महानगर व महाराष्ट्र राज्यभरातून आले होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा