वेळेवर सीपीआर दिल्यामुळे 55 वर्षीय व्यक्तीला जीवदान
वेळेवर सीपीआर दिल्यामुळे 55 वर्षीय व्यक्तीला जीवदान
पुणे,17 ऑक्टोबर 2025 : तातडीच्या परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे हे जीवन-मरणामधील फरक ठरू शकतो.याचाच प्रत्यय नुकत्याच एका आरोग्य शिबिरात आला.धनकवडी येथे भरवलेल्या या शिबिरात अचानक कोसळलेल्या 55 वर्षीय व्यक्तीला तेथे उपस्थित असलेल्या विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील ईमर्जन्सी व क्रिटिकल केअर मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ.रोहित व्यवहारे यांनी वेळेवर सीपीआर दिल्यामुळे प्राण वाचू शकले.
याबाबत माहिती देताना, विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील ईमर्जन्सी व क्रिटिकल केअर मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ.रोहित व्यवहारे म्हणाले की,नुकतेच आम्ही एका महाआरोग्य शिबिरात भाग घेतला होता,तेथे अनेक आरोग्य सेवा संस्था सहभागी झाल्या होत्या.शिबिर सुरू असताना माझ्या टीम सदस्यांनी अचानक कोसळलेल्या एका व्यक्तीकडे माझे लक्ष वेधले. अशा प्रसंगांमध्ये तातडीची मदत अत्यंत मोलाची ठरते.हृदय बंद पडण्याची घटना अचानक होऊ शकते आणि प्रत्येक मिनिटाला प्राण वाचण्याची शक्यता कमी होत जाते.त्यामुळे वैद्यकीय मदत मिळेस्तोवर रक्त आणि प्राणवायूचा प्रवाह शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत व्यवस्थित सुरू राहावा यासाठी सीपीआर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
डॉ.रोहित यांनी तातडीने प्रक्रिया केली आणि कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) दिले. केवळ आठ मिनिटांत हा रूग्ण शुध्दीवर आला आणि नंतर त्यांचे कुटुंबिय पुढील उपचारांसाठी रूग्णालयात घेऊन गेले.
अचानक हृदयविकाराचा झटका येणे आणि हृदय बंद पडणे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे,हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. हृदय बंद पडणे आणि वैद्यकीय मदत यामधील वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्वरित उपचार केल्यास मृत्यूचा धोका तसेच संभाव्य अपंगत्व टळण्यास मदत होऊ शकते.
वेळेवर सीपीआर आणि त्वरित वैद्यकीय मदत किती जीव वाचवू शकते याचे हे एक प्रभावी उदाहरण आहे, असे डॉ.व्यवहारे म्हणाले. या रूग्णाच्या स्थितीत वैद्यकीय टीम उपलब्ध होती,मात्र अशी परिस्थिती कुठेही,कधीही उद्भवू शकते,म्हणून मोठ्या प्रमाणात लोकांना सीपीआर आणि एईडी मशीन वापरण्यासारख्या जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
विश्वराज हॉस्पिटल,लोणी तर्फे नेहमीच सीपीआर बाबत जागरूकता वाढविण्याकरिता विविध ठिकाणी जागरूकता निर्माण केली जाते.
Comments
Post a Comment