एकाच वेळी एकच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम सोहळापुण्यात रविवारी (दि.५) सुमारे १ हजार १११ हून अधिक शंखवादकांसह होणार प्रथमच जागतिक विक्रम
एकाच वेळी एकच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम सोहळा
पुण्यात रविवारी (दि.५) सुमारे १ हजार १११ हून अधिक शंखवादकांसह होणार प्रथमच जागतिक विक्रम
पुणे : हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक अर्थात केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्व विक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सुमारे १ हजार १११ हून अधिक शंखवादकांसह एकत्रित वादन रविवार, दि. ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन ३७५ वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५१ वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकराचे ३०० वर्ष जयंती महात्मा जोतिबा फुले यांच्या १३५ पुण्यतिथी वर्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्ष सोहळा यानिमित्ताने हे आयोजन करीत आहोत, अशी माहिती पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला किशोर चव्हाण, रणजित हगवणे, नितीन महाजन, काळूराम डोमाळे, शैलेंद्र भालेराव, सुहास मदनाल आदी उपस्थित होते.
विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, जगदगुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, विचारवंत सोपानदादा कानेरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याशिवाय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रा.स्व.संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शि.प्र. मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष अॅड.एस. के. जैन, तसेच भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, याच बरोबर सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार अवधूत गांधी, सिने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आदी मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.
वर्ल्ड रेकॉड बुक आॅफ इंडिया या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. याकरिता गेली १ वर्षा पासून तयारी सुरु असून शंखवादक पुणे महानगर व महाराष्ट्र राज्यभरातून येणार आहेत. तरी पुणेकरांनी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment