कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील डीईएस पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
डीईएस पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : जर्मनी आणि जपान या देशांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारशी करार केला आहे. ही कौशल्य असणारी नवी पिढी भारतात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन, रोजगाराभिमुख पिढी निर्माण करण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 'डीईएस पुणे विद्यापीठा'च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र आचार्य, डीईएसचे उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, डीईएस संस्थेचे कार्यवाह प्रा. डॉ. आनंद काटीकर आणि डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेश इंगळे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, "आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसात ती तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठांचे कार्य महत्त्वाचे राहणार आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा प्रयत्न आहे की, २०४७ मध्ये हा देश जगात सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर राहायला हवा. त्यासाठी आपल्याला विकसित भारत २०४७ या उद्देशाला पूर्णत्वास न्यायचे आहे. आपल्याला हा उद्देश तीन टप्प्यात पूर्ण करायचा आहे. यासाठी आपल्या प्रत्येकाला आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम काम करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शिक्षणाला स्वायत्त करण्याचे धोरण आपण स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे नवीन विद्यापीठे स्थापन करण्याला पाठिंबा दिला आहे. या विद्यापीठांनी स्थानिक गरजांना ओळखून, चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. या विद्यापीठातून जगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे."
डीईएस पुणे विद्यापीठाला नवीन इमारत, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. पाटील यांनी डीईएस पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या मागील घडामोडी उपस्थितांना सांगत, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आणि अद्ययावत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेश इंगळे यांनी स्वागतासाठीचे भाषण केले आणि विद्यापीठाच्या कार्याचा आढावा घेतला. डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र आचार्य यांनी संस्थेबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन आणि भविष्यातील योजना सांगितल्या. डीईएसचे विश्वस्त अनंत जोशी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
...
शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी कोणतीही अडचण नाही. राज्य सरकार वसतिगृह, प्रयोगशाळा निर्मितीसाठी खर्च करीत आहोत. हे कार्य पाहून केंद्र सरकारने ३५० कोटी रुपये दिले. त्यातून ४२ पॉलिटेक्निक आणि ८ सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाला सुमारे ८ कोटी रुपये देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Comments
Post a Comment