नवनवोन्मेष संगीत सभा उत्साहात संपन्नयुवा पिढीने युवा शिष्यांसाठी केले आयोजन
नवनवोन्मेष संगीत सभा उत्साहात संपन्न
युवा पिढीने युवा शिष्यांसाठी केले आयोजन
पुणे : युवा पिढीच्या सादरीकरणाने रंगली गायन-वादनाची सुरेल मैफल. गायनातून साकारले राग मुलतानी, देस, केदार तर बासरी वादनातून उलगडला राग पूरिया कल्याण. निमित्त होते कोथरूडमधील बेडेकर गणपती मंदिर सभागृहात आयोजित नवनवोन्मेष संगीत सभेचे.
भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जपत ती पुढील पिढीकडे प्रवाहीत ठेवण्यासाठी काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे नवनवोन्मेष संगीत सभेचे आयोजन करण्यात येते. या संगीत सभेचे यंदाचे दुसरे वर्ष होते.
काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव विदुषी मंजुषा पाटील यांच्या संकल्पनेतून गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. शिष्यांनी शिष्यांसाठी निर्माण केलेले हे व्यासपीठ फक्त शिकण्यासाठी नाही, तर शिकलेले सादर करण्याचे तसेच आणि सादरीकरण ऐकण्याचीही सवय लावणारे आहे. ‘तानसेन’ सोबतच ‘कानसेन’ घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे
कार्यक्रमात सुरुवातीस विदुषी मंजुषा पाटील यांच्या शिष्या नुपूर देसाई यांनी राग मुलतानीतील ‘गोकुल गाव का छोरा, बरसाने की नार’ हा बडा ख्याल (ताल तिलवाडा) सादर केला. त्यानंतर ‘मानत नाही जियरा मोरा’ ही जोडबंदिश, तसेच राग देस मधील ‘सखी घन गरजत अती घोर’ ही ठुमरी सादर केली. त्यानंतर एक तराणा सादर करून नुपूर देसाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सुप्रसिद्ध बासरी वादक पंडित रूपक कुलकर्णी यांचे शिष्य मृगेंद्र मोहाडकर यांनी एकल बासरीवादनातून राग पूरिया कल्याण सादर केला. आलाप, जोड, झाला यांचा सुंदर प्रवास घडवून त्यांनी मध्यलय रूपक व द्रुत तीनतालातील बंदिश ऐकवून रसिकांची वाहवा मिळवली.
प्रसिद्ध गायक पंडित निषाद बाकरे यांचे शिष्य साहिल भोगले यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात तिलवाडा तालातील ‘जुगनुवा चमके रयो’ या बंदिशीने केली. त्यानंतर एकतालातील ‘चतर सुगर बलमा तुम’ आणि तीनतालातील ‘सैया मोरा रे मतवारी वारी रे’ या बंदिशी सादर करून त्यांनी रसिकांना आनंदित केले.
कलाकारांना पार्थ ताराबादकर (तबला), मालू गावकर (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली.
काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर, गुरुकुल संगीत विद्यालयाच्या गुरू, विदुषी मंजुषा पाटील यांच्यासह रसिकाग्रणी श्रीकांत कडुसकर, गायक पं. निषाद बाकरे, प्रख्यात हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी, प्रख्यात सतार वादक संदीप आपटे, गणेश चिंचणीकर यांची उपस्थिती होती.
श्रीकांत कडूसकर म्हणाले, काणेबुवा प्रतिष्ठानचे कार्य मी सुरुवातीपासून बघत आलेलो आहे. प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रमांपैकी हा विद्यार्थी करत आहेत याचा खूप आनंद आहे. यातून रसिकांना युवा पिढीचे सादरीकरण अनुभवायला मिळते आहे. शास्त्रीय संगीताची अभिजात कला अशीच पुढे प्रवाहित राहिल याची खात्री वाटते.
याप्रसंगी या उदयोन्मुख युवा कलाकारांचा सत्कार श्रीकांत कडुसकर यांच्या हस्ते तर श्रीकांत कडुसकर आणि पं. निषाद बाकरे यांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
Comments
Post a Comment