चंद्रकंस, कौशिकरंजनी, रागेश्री कंस, पुराना चंद्रकंस, मधुकंस आणि मधुरकंस रागांचे मनोहारी सादरीकरणस्वरावर्तन आयोजित ‌‘कंस‌’ प्रकार मैफलीत आरती ठाकूर-कुंडलकर यांचे सुश्राव्य गायन

चंद्रकंस, कौशिकरंजनी, रागेश्री कंस, पुराना चंद्रकंस, मधुकंस आणि मधुरकंस रागांचे मनोहारी सादरीकरण
स्वरावर्तन आयोजित ‌‘कंस‌’ प्रकार मैफलीत आरती ठाकूर-कुंडलकर यांचे सुश्राव्य गायन

पुणे : भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत अनेकविध रागरागिण्यांनी समृद्ध आहे. यातील ‌‘कंस‌’ या प्रकारातील विविध रागांचे मनोहारी दर्शन आज रसिकांना घडले. किराणा घराण्यातील ज्येष्ठ गुरू लीलाताई घारपुरे आणि जगविख्यात शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांनी गुरूंच्या सान्निध्यात ग्रहण केलेल्या सांगीतिक वारश्यातील ज्ञान पुढील पिढीपर्यंत प्रवाहित रहावे या हेतूने या मैफलीची मांडणी केली होती.

आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या शिष्य परिवाराच्या पुढाकारातून स्वरावर्तन फाऊंडेशनतर्फे या राग संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफल न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात आयोजित करण्यात आली होती. डॉ. दिलीप देवधर यांची विशेष उपस्थिती होती. 

कुंडलकर यांनी मैफलीची सुरुवात चंद्रकंस रागातील ‌‘अब कल नाही मनवा‌’ या विलंबित एकतालातील बंदिशीने केली. या नंतर तीन तालातील ‌‘मूरत मन भाए मोहन की‌’ ही बंदिश सादर करून त्याला जोडून कौशिकरंजनीतील आडा चौतालातील सुयोग कुंडलकर रचित ‌‘मोरी आली मोहे अब नाही चैन‌’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. रागेश्री कंस सादर करताना रूपक तालातील ‌‘नाद भेद अपार कोहून‌’ आणि ‌‘ए सूर साधे षड्ज गंधार‌’ ही बाळासाहेब पुंछवाले यांची बंदिश सादर करून आरती ठाकूर-कुंडलकर यांनी रसिकांना मोहित केले.

ओडव बागेश्री म्हणजेच राग पुराना चंद्रकंस मांडताना त्यांनी ‌‘लगन तोसे लागी बनवारी‌’ ही अध्धा तीन तालातील बंदिश तयारीने सादर केली. डॉ. प्रभा अत्रे यांची राग मधुकंसमधील ‌‘माने ना माने ना कान्हा मोरी बतिया‌’ या बंदिशीची रसिकांना झलक ऐकविली. मैफलीची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक अभ्यासातून निर्माण झालेल्या मधुरकंस रागाने केली. या रागातील ‌‘पार करो मोरी नैय्या‌’ ही गुरूंनी रचलेली बंदिश ऐकविताना आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनातून गुरुस्वरांची अनुभूती आली. 

गुरूंकडून प्राप्त झालेले शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ज्ञान आरती ठाकूर-कुंडलकर यांनी संगीत अभ्यासक, विद्यार्थी, रसिक यांच्यासमोर सादर करताना त्यांची गुरूंप्रति असलेली श्रद्धा, प्रेमभाव, तल्लीनता, एकरूपता आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या ओढीतून बहरत गेलेले गायन रसिकांच्या मनात अवितरपणे गुंजत राहिले. आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर यांच्या शिष्यांनी आयोजित केलेल्या या मैफलीत गुरू आणि शिष्यांमधील भावनिक अनुबंधाचे अनोखे दर्शन रसिकांना घडले. आरती ठाकूर-कुंडलकर यांना संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), मीनलता जोशी-देशपांडे, कस्तुरी कुलकर्णी (तानपुरा) यांनी सुरेल-समर्पक साथ केली.

डॉ. दिलीप देवधर, आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर यांच्या हस्ते सुरुवातीस दीप प्रज्वलन झाले. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी दहा वर्षांपासून स्वरावर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर सजगपणे कार्यरत आहेत. फाऊंडेशनच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या माहितीपटाचे अनावरण या प्रसंगी डॉ. दिलीप देवधर यांच्या हस्ते झाले. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसह अनेक मान्यवर मैफलीस आवर्जून उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा**एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय ; सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा