महानगरपालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत नाट्यगृहातही मराठी चित्रपट दाखवावेत - मेघराज राजे भोसले
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या निर्मितीत मोठी भर पडत असून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारावेत. तसेच नाट्यगृहांमध्ये स्क्रीन व प्रोजेक्टरची सोय करून दिवसा २ वेळा तेथे मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केली.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक तरुण – तरुणी उत्कृष्ट चित्रपट निर्मिती, अभिनय, दिग्दर्शन, पटकथा संवाद लेखन, सिनेमॅटोग्रॅफी याकडे वळत आहेत. जागतिक मराठी स्पर्धात्मक विभाग असणारे महाराष्ट्र शासनाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यासपीठही आता उपलब्ध आहे. त्यासाठीच मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बहर येण्यासाठी शासन अथवा महानगरपालिकांनी नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारावीत आणि नाट्यगृहांमध्ये स्क्रीन व प्रोजेक्टरची व्यवस्था करून दिवसातून २ वेळा मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केल्यास मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत ही अडचण कायमची दूर होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत असे नमूद करून मेघराज राजे भोसले म्हणाले की पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन देखील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी ५ लाख रुपयांचा ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देत असते. तसेच अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखन आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रॅफी यांना प्रत्येकी २५, ००० रु. असे पुरस्कार दिले जातात. यामुळे सर्वोत्कृष्ट देण्याचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रयत्न होत आहे ही समाधानाची बाब आहे असे ते म्हणाले.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले मराठी चित्रपट निघाले तरी त्यांना थिएटर्स नाही मिळाली व प्रेक्षक नाही मिळाले तर उपयोग काय ? असा सवाल उपस्थित करून मेघराज राजे भोसले म्हणाले की त्यासाठीच शासन अथवा महानगर पालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत व नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करावी. याशिवाय मराठी प्रेक्षकांनी देखील वर्षातून किमान काही मराठी चित्रपट थिएटर्समध्ये बघायचेच असे संकल्प केल्यास मराठी चित्रपटसृष्टीला आधार मिळेल असे ते शेवटी म्हणाले.
Comments
Post a Comment