अनवट प्रभातकालीन रागांची रसिकांना सांगीतिक मेजवानीऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘स्वर प्रभात’ मैफलीत विदुषी श्रुती सडोलीकर यांचे बहारदार गायन


अनवट प्रभातकालीन रागांची रसिकांना सांगीतिक मेजवानी

ऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘स्वर प्रभात’ मैफलीत विदुषी श्रुती सडोलीकर यांचे बहारदार गायन

 

पुणे : सुविख्यात गायिका विदुषी श्रुती सडोलीकर यांनी बहारदारपणे सादर केलेल्या राग अहिर भैरव, विभास, सुखिया बिलावल, बहादुरी तोडी, देसकार, हिंडोल बहार अशा अनवट प्रभातकालीन रागांनी रसिकांना जणू सांगीतिक मेजवानी मिळाली.

कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे विदुषी श्रुती सडोलीकर यांच्या ‘स्वर प्रभात’ या शास्त्रीय गायन मैफलीचे रविवारी (दि. १) आयोजन करण्यात आले होते. एकाच गायकाची पूर्णवेळाची मैफल हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.

जयपूर-अत्रौली घराण्याच्या विदुषी श्रुती सडोलीकर यांनी मैफलीची सुरुवात राग अहिर भैरवमधील ‘भोर भई श्याम’ या बडा ख्यालने केली. त्याला जोडून ‘सेजिया सजाए’ हा द्रुत ख्याल प्रभावीपणे सादर केली.

विभास रागाचा प्रकार सादर करताना ‘सुअब मोरे सुरजनवा’ ही बंदिश सादर करून रसिकांना आनंदित केले. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या सुखिया बिलावल रागातील ‘देवी दुर्गे’ या देवी स्तुतीने रसिकांचे चित्त प्रफुल्लित झाले.

राग बहादुरी तोडीची झलक ऐकविताना श्रुती सडोलीकर यांनी ‘महादेव देवन’ ही पारंपरिक रचना मोठ्या ताकदीने ऐकविली. ‘सूर साधना लय कल्पना’ या राग देसकार ‍मधील रचनेने रसिक मोहित झाले. हिंडोल बहार रागाचे सादरीकरण करताना त्यांनी ‘उजत चंद्र मधु बोल माधवा’ या रचनेतून कृष्णलीला आणि वसंत ऋतुचे सुखद सौंदर्य प्रकट केले. कार्यक्रमाची सांगता ‘राम रंगी रंगले मन’ या मराठीतील सुप्रसिद्ध रचनेने करून रसिकांची वाहवा मिळविली.

सडोलीकर यांना अभय दातार (तबला), अनंत जोशी (संवादिनी), राधिका जोशी, तेजा काळे-गोडसे (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.

दुर्मीळ बंदिशी तसेच अनवट आणि अवघड रागांवर असणारे प्रभुत्व, गायनातील लयकारीचे सुरेल काम, रागाचे सौंदर्य उलगडताना त्याची जपलेली शुद्धता यावर प्रभुत्व असणाऱ्या श्रुती सडोलीकर यांना रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. 

दिपावली या आनंदाच्या सणाची लागलेली चाहूल, हवेत जाणवू लागलेला सुखद गारवा आणि अनवट रागांच्या मोहित करणाऱ्या सुरांनी मैफलीचा आनंद उत्तरोत्तर वाढतच गेला.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत