विदुषी गीतांजली लाल यांच्या साभिनय पदन्यासाचा अनोखा अविष्कारकलाछाया सेंटरतर्फे गीतांजली लाल यांचा कलाप्रभा पुरस्काराने गौरव


विदुषी गीतांजली लाल यांच्या साभिनय पदन्यासाचा अनोखा अविष्कार

कलाछाया सेंटरतर्फे गीतांजली लाल यांचा कलाप्रभा पुरस्काराने गौरव

पुणे : कलाछाया कल्चरल सेंटर आयोजित ‘विरासत’ या सांस्कृतिक कथक संध्या कार्यक्रमात जयपूर घराण्याच्या नामवंत कथक नृत्यांगना, गुरू विदुषी गीतांजली लाल (दिल्ली) यांचा प्रतिष्ठेच्या पहिल्या ‘कलाप्रभा पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. ८०च्या उंबरठ्यावर असलेल्या विदुषी गीतांजली लाल यांच्या साभिनय पदन्यासाचा अनोखा अविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला.

पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज आणि गुरू पंडिता प्रभा मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकार नगरमधील कलाछाया कल्चरल सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ व ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खानसाहेब यांच्या हस्ते झाले. शाल, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार, कलाछाया कल्चरल सेंटरच्या प्रमुख रश्मी जंगम-पांडकर, ज्येष्ठ तबलावादक भरत जंगम, निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे, जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध नृत्यांगना विधा लाल, तबला वादक हिरेन चाटे, माधवी वैद्य मंचावर होते.

पुरस्काराविषयी मनोगत व्यक्त करताना गितांजली लाल म्हणाल्या, सर्व गुरूंनी दिलेली तालीम आणि आई-वडिलांच्या पाठींब्यामुळे मी नृत्याच्या क्षेत्रात भरीव कार्य करू शकले. ‘कलाछाया’च्या माध्यमातून पंडित बिरजू महाराज, मुन्नालाल शुक्ला आणि प्रभा मराठे यांनी घालून दिलेले आदर्श वर्षानुवर्षे सांभाळले जावेत. ‘मोहे छेडो ना सुनो नंद के छैला’ या बंदिशीवर साभिनय पदन्यास करून गीतांजली लाल यांनी रसिकांना स्तिमीत केले.

विधा लाल यांनी आपल्या नृत्य प्रस्तुतीची सुरुवात गुरू माँ गितांजली लाल रचित शिवअष्टकाने केली. त्यानंतर तीन तालाचे लोभस दर्शन घडवित कथक नृत्य प्रकारातील जयपूर घराण्यातील विविध थाट, उठान, चलन, त्रिपल्ली आदी वैशिष्ट्ये नृत्यातून साकारली.

सुरुवातीस रश्मी जंगम-पांडकर आणि त्यांच्या शिष्यांनी कथक नृत्याच्या माध्यमातून धृपदचे सुखद दर्शन घडविले. एकल नृत्यातून रश्मी जंगम-पांडकर यांनी पद्मविभूषण बिरजू महाराज तसेच गुरू प्रभा मराठे यांना काही नृत्यरचना समर्पित केल्या. अभिनय पक्ष साकारताना ‘झुलत राधे नवल किशोर’ प्रस्तुत केले. इबादत ही नृत्यरचना विद्यार्थ्यांनी साकारली.

उस्ताद उस्मान खानसाहेब म्हणाले, कलाछायाचा मंच हा पुण्यातील एक आदर्श नृत्यकेंद्र बनले आहे. उल्हास पवार यांनी प्रभा मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मनोज देसाई (गायन), सुनील अवचट (बासरी), हिरेन चाटे, चारुदत्त फडके (तबला), कल्याणी देशपांडे (सतार) यांनी समर्पक साथसंगत केली. धनश्री हेबळीकर यांनी सूत्रसंचालन केले तर मानस साठे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत