शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हल्ल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र निषेध

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हल्ल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र निषेध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, तर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची तातडीने बदली करावी  


        पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ तसेच पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची तातडीने बदली करण्यात यावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
        या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आणि पश्चिम विभागाचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी केले.यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
      यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले की,"पुणे शहर हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, अलीकडच्या काळात शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. कोयते, पिस्तूल यांसारख्या घातक शस्त्रांचा वापर करून खुलेआम हल्ले करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले,विशेष म्हणजे, ज्या न्यायालय परिसरात नागरिक न्याय मिळवण्यासाठी येतात, त्याच परिसरात अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. न्यायालय परिसरातही नागरिक सुरक्षित नसतील, तर शहरातील इतर ठिकाणच्या सुरक्षेची काय अवस्था असेल, हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला.
        तसेच ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही गृहविभागाची आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची तातडीने बदली करावी, ही आमची मागणी आहे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर पुणेकरांना सुरक्षिततेची ठोस हमी मिळाली पाहिजे. या घटनेतील सर्व आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच शहरातील अवैध शस्त्रांचा वापर आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष गप्प बसणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू."अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत