पुण्याचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाला प्रारंभ*श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर ; मंदिराला फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई


*पुण्याचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्सवाला प्रारंभ*

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर ; मंदिराला फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई

पुणे : कसबे पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिरात जन्माष्टमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत आणि क्षेत्रपाल असलेल्या श्री काळभैरवनाथांच्या जयंतीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भजन, कीर्तन, अघोर होम, अष्टोत्तर शतनामावली, आरती आणि ललिता सहस्रनाम पठण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी जन्माष्टमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर, कसबा पेठ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पहिल्या तीन दिवशी सकाळी ६.३० ते ९ या वेळेत अभिषेक व महापूजा, सकाळी ९.३० ते १०.३० सनई वादन, दुपारी १२ वाजता अष्टोत्तर शतनामावली व आरती, दुपारी ४ ते ५ या वेळेत भजन व कीर्तन तसेच अघोर होम, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ललिता सहस्रनाम पठण आणि रात्री ८ वाजता आरती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

शनिवारी (दि. २८) सकाळी अभिषेक व महापूजा, सनई वादन, दुपारी अष्टोत्तर शतनामावली व आरती, दुपारी ४ ते ५ या वेळेत अघोर होम आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आरती होणार आहे. रविवारी (दि. २९) सकाळी अभिषेक व महापूजा, सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत ग्रामहोम, दुपारी अष्टोत्तर शतनामावली व आरती, दुपारी ४ वाजता भजन व कीर्तन तसेच भैरवाष्टक, सायंकाळी ६ वाजता ललिता सहस्रनाम पठण आणि रात्री ७ वाजता आरती होईल.

सोमवारी (दि. ३०) सकाळी अभिषेक व महापूजा, सनई वादन, दुपारी अष्टोत्तर शतनामावली व आरती, दुपारी ४ वाजता श्री दुर्गापूजा, सायंकाळी ६ वाजता कर्नाटक सनई पाटण आणि रात्री ७ वाजता आरती होणार आहे. मंगळवारी (दि. १ डिसेंबर) श्री काळभैरवनाथ जन्माष्टमीच्या मुख्य दिवशी सकाळी ६.३० ते ९ या वेळेत लघुरुद्र व महापूजा, सकाळी ९.३० वाजता सनई वादन, दुपारी १२ वाजता अष्टोत्तर शतनामावली व आरती, रात्री ८ वाजता आरती होईल. रात्री १० ते ११.३० या वेळेत अभिषेक व महापूजा, तर रात्री १२ वाजता श्री काळभैरवनाथांचा जन्मसोहळा साजरा होणार आहे.

श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून, मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून, वर्षभर विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. उत्सवानिमित्त रविवार (दि. ६ डिसेंबर) रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवासाठी ऐच्छिक वर्गणी मंदिरात स्वीकारली जाणार आहे. भाविकांनी उत्सवातील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत