संगीत रामदासायन’ : प्रभावी सादरीकरणातून उलगडला समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपट
‘संगीत रामदासायन’ : प्रभावी सादरीकरणातून उलगडला समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनपट
पुणे : ‘गोदाकाठी जांब गाव ते ठोसर कुलवंत’, ‘राणूपुत्र जन्मला गं’, ‘ऐक ऐक सखये बाई’, ‘राणूबाईचा पुत्र सखे गं,‘शांत जाहले मन हे दादा हरिदर्शनाने’, ‘भेट द्याहो रामराया’, ‘तव भेटीचा ध्यास जीवाला’, ‘विजयश्री माळ गळा’, ‘तुम्ही थोर ज्ञानी, तुम्ही हो समर्थ’ अशा विविध भक्तीरचनांमधून समर्थ रामदास स्वामी यांची जीवनकथा उलगडली.
निमित्त होते स्वरप्रभा फाऊंडेशन आयोजित ‘संगीत रामदासायन’ या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्यावरील जीवन काव्यांच्या सादरीकरणाचे. हा अलौकिक सोहळा शनिवारी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. प्रतिभा गारटकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर साकारलेले काव्य, त्याला पराग पांडव यांनी चढविलेला स्वरसाज, प्रभावी निरूपण आणि गायन यातून भक्तीरसाची परिपूर्ण अनुभूती रसिकांना मिळाली. रेणुका पांडे-कुरूलकर यांनी सहगायन केले. समीर बंकापुरे (तबला), पवन अवचरे (पखवाज), अदिती गराडे (संवादिनी), सत्यजित सराफ (की-बोर्ड), नरेंद्र काळे (तालवाद्य) आणि माधुरी सुतार (कोरस) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा जयघोष करीत ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या गजराने करण्यात आली. श्रीरामांच्या दृष्टांतातून सूर्याजीपंतांना मिळालेला त्रयोदशाक्षरी मंत्र, त्याच्या जपसामर्थ्याने झालेली दोन पुत्रांची प्राप्ती, सूर्यदेवांच्या प्रसादाप्रमाणे वज्रअंश घेऊन अवतरलेला नारायण, त्याची बालपणातील खोडकर वृत्ती, आई राणूबाईंच्या शिकवणुकीमुळे नारायणाच्या चित्तवृत्तीत झालेले बदल यांची अतिशय समर्पक मांडणी करून पराग पांडव यांनी रसिकांना प्रभावीत केले.
आपल्याला गुरुमंत्र द्यावा यासाठी मारुतीरायाला शरण गेलेला नारायण, त्यांच्या दर्शनाने तृप्त आणि शांत झालेला नारायण याचे वर्णनही अनोखे ठरले. आईच्या आग्रहाखातर लग्नाला उभा राहिलेला नारायण, शुभमंगल सावधान ऐकताक्षणी बोहल्यावरून काढलेला पळ, श्रीरामाच्या भेटीची ओढ मनात घेऊन नाशिकजवळील टाकळी येथे एक तप केलेली तपश्चर्या, १३ कोटी रामनामाचा जप आदी प्रसंग अतिशय भावपूर्णतेने निरूपण व गीतांच्या माध्यमातून साकारले गेले.
समाजाचे अवलोकन करत पायी भ्रमंती करताना समर्थ रामदास स्वामींनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, बलोपासनेचे जाणलेले महत्त्व, त्यातून मारुतीरायांच्या ११ मंदिरांची केलेली स्थापना, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट असे प्रसंग ऐकविताना पराग पांडव यांनी आपले गायन व निरुपणातील प्रभुत्व दर्शविले.
समाज एकत्र आल्याशिवाय सुधारणा होणार नाही, हिंदुत्वाचा प्रचार होणार नाही याची महती जाणून घेऊन छत्रपती शिवरायांना केलेले मार्गदर्शन असे प्रसंगही सहजतेने गुंफले गेले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेने समर्थ रामदास स्वामी यांच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाचे वर्णन करून कार्यक्रमाची सांगता ‘राज्य मराठी आनंद भुवनी’ या भैरवीतील रचनेने करण्यात आली. सादरीकरणाला तसेच रचनांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.
Comments
Post a Comment