अभिनव सीबीएसई शाळेत ‘कौशल मेळा’ उत्साहात संपन्न*
*अभिनव सीबीएसई शाळेत ‘कौशल मेळा’ उत्साहात संपन्न*
नऱ्हे येथील अभिनव सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भव्य ‘कौशल मेळा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष राजीव जगताप , खजिनदार ध्रुव जगताप आणि शाळेच्या प्राचार्या डॉ. आरती गांगुर्डे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृतीतून विविध कौशल्यांचा विकास व्हावा, स्वावलंबनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच उद्योजकतेचे प्राथमिक धडे मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.विद्यार्थ्यांनी
आगामी दिवाळी सणाचे औचित्य साधून स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, तोरणे, उटणे, विविध सजावटीच्या वस्तू, वॉल हँगिंग आणि सुंदर दागिने बनवले त्यामुळे मेळाव्याची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या वस्तू उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरल्या.
या मेळाव्यात खाद्यपदार्थांचे स्टॉलदेखील विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली भेळ, पाणीपुरी, सँडविच, ढोकळा, केक तसेच विविध चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल उत्साहाने सजवून त्यांची विक्री, ग्राहकांशी संवाद आणि व्यवहार व्यवस्थापनाची जबाबदारीही आत्मविश्वासाने पार पाडली.
शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी मेळाव्यातील सर्व स्टॉलना आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून तसेच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, कल्पकता आणि व्यावहारिक कौशल्ये पाहून पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो, त्यांच्यात आत्मविश्वास, स्वावलंबन, संघभावना आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होतो. आनंददायी अनुभवातून शिक्षण देणारा हा ‘कौशल मेळा’ विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. यावेळी नऱ्हे संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment