रोटेरियन्स लेखक-कलाकारांची प्रगल्भता हे स्पर्धेच्या सातत्याचे यश : मंगला गोडबोले
रोटेरियन्स लेखक-कलाकारांची प्रगल्भता हे स्पर्धेच्या सातत्याचे यश : मंगला गोडबोले
रंगभूमी हा एकमेकांवरील विश्वासाचा खेळ : मंगला गोडबोले
रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आयोजित आंतर रोटरी स्वाती क्षीरसागर करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण
रोटरी क्लब तळेगाव दाभाडेच्या ‘श्री तशी सौ’ एकांकिकेस स्वाती क्षीरसागर करंडक
पुणे : समाजाला, व्यवस्थेला नको असते ते काळाच्या ओघात मागे पडत जाते. सध्याचा वेगवान काळ कुठलीही गोष्ट टिकू देत नाही. असे असूनही स्पर्धा टिकून आहे. कलाकार, तंत्रज्ञ गैरसोयींवर मात करीत स्पर्धेत सहभागी होत आहेत. लेखकापासून कलाकारांच्या सादरीकरणात प्रगल्भता येत आहे, हे या स्पर्धेच्या यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी केले. रंगभूमी हा एकमेकांवरील विश्वासाचा खेळ आहे. सहकलाकार, तंत्रज्ञ याचा एकमेकांवरील विश्र्वास आणि जय-पराजयाचा अनुभव घेण्यासाठी रंगभूमीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर रोटरी ‘स्वाती क्षीरसागर करंडक’ एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (दि. १) मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. भरत नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे २७वे वर्ष आहे.
प्रांतपाल नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, सचिव केदार साठे, डिस्ट्रिक्ट एकांकिका कन्व्हेनर कल्याणी पेंढारकर, को कन्व्हेनर अश्विनी अंबिके, क्लब ॲडमिन डायरेक्टर विजय गोखले, शिरीष क्षीरसागर, तसेच परीक्षक गौरी लागू, प्रवीण जोशी, राहुल लामखडे मंचावर उपस्थित होते.
रोटरी क्लबसंदर्भातील आठवणींना उजाळा देऊन मंगला गोडबोले पुढे म्हणाल्या, ललित लेखक असल्यामुळे माझ्या मनाच्या रंगभूमीवर खूप नाटके सुरू असतात. एकांकिका ३०-४० मिनिटात संपते, पण माझ्या मनातील नाटक अनेक पात्रांना घेऊन खूप दिवस सुरू असते. कधीतरी त्या नाटकाचा शेवट, औचित्य सापडते. त्या वेळी असे वाटते की, कशासाठी आपण एवढे झुंजलो, तर त्या औचित्यपूर्ण क्षणाचा आनंद घेण्यासाठी. रंगभूमीवर घडणारे नाटक हे नाटकच आहे हे माहित असून सुद्धा त्याच्याशी आपण तादात्म्य पावतो ही रंगभूमीची ताकद आहे. रोटेरियन्सनी लिहिलेल्या एकांकिका संकलित करून त्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
परीक्षकांच्या वतीने बोलताना गौरी लागू यांनी लेखन, अभिनय, दिग्दर्शन याविषयी मौलिक सूचना केल्या. स्पर्धेच्या माध्यमातून मैत्रीचे संबंध जोपासले गेल्याचे प्रकाश गायकवाड म्हणाले. प्रांतपाल नितीन ढमाले यांनी उपक्रमाचे कौतुक करून पुढील वर्षी स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
कल्याणी पेंढारकर यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल अश्विनी अंबिके यांनी जाहीर केला. शिरीष क्षीरसागर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नितीन अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले तर विजय गोखले यांनी आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल -
सांघिक प्रथम : श्री तशी सौ (रोटरी क्लब तळेगाव दाभाडे), सांघिक द्वितीय : तो (रोटरी क्लब पुणे, गांधीभवन), सांघिक तृतीय : ॲब्युज (रोटरी क्लब प्रिस्टिन).
सर्वोत्कृष्ट अभिनय - पुरुष : द्वितीय : देवेंद्र सारळकर, तृतीय : (विभागून) : सुरेश नगरकर, राजीव देशमुख.
सर्वोत्कृष्ट अभिनय - स्त्री : प्रथम : माधुरी कुलकर्णी, द्वितीय : अंजली वांबुरकर, तृतीय : वृषाली रणधीर.
दिग्दर्शन - प्रथम : विजय कुलकर्णी (श्री तशी सौ), द्वितीय : ऋचा मोकाशी (तो), तृतीय : अनुपमा जोशी (सुडनीती).
सर्वोत्कृष्ट लेखक - प्रथम : सुदिन आपटे (अॅब्यूज), द्वितीय : उज्ज्वला बर्वे (तो), संजय डोळे (विषवेलांत).
कुमारवयीन नाटके - सन्मानचिन्ह : देवेंद्र भिडे, ज्ञानेश वैद्य. अश्विनी अंबिके.
प्रथमच भाग घेणारा क्लब : रोटरी क्लब पुणे एअरविंग्ज
उत्कृष्ट अभिनय - रोटरॅक्टर : श्रावणी शेंडकर.
उत्कृष्ट अभिनय - ॲनेट : सानवी पाथरकर, सृष्टी शिंदे.
उत्कृष्ट नेपथ्य - प्रथम : विवेक लेले, जुई कुलकर्णी, अमेय विद्वांस. द्वितीय : सनी कुंदरम, तृतीय : प्रदीप गिरी.
उत्कृष्ट प्रकाशयोजना - प्रथम : आनंद शाळीग्राम, द्वितीय : रोहन देशपांडे, तृतीय : विजय गोखले.
उत्कृष्ट पार्श्वसंगीत - प्रथम : मधुर डोलारे, द्वितीय : अमर कोटबागी, तृतीय : हिमांशू चौधरी.
Comments
Post a Comment