शिक्षकांचे महत्त्व तंत्रज्ञान युगातही कायमच!* — *हेमंतकुमार नंदा
*शिक्षकांचे महत्त्व तंत्रज्ञान युगातही कायमच!* — *हेमंतकुमार नंदा*
— शिक्षकच विद्यार्थ्याना संस्कार,मूल्ये आणि दिशा देणारे खरे मार्गदर्शक — हेमंतकुमार नंदा
रेंज हिल्स हायस्कूलमध्ये ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण
पुणे, ५ सप्टेंबर : “कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही,” म्हणून तंत्रज्ञान कितीही बदलले तरी शिक्षकांचे महत्त्व कायमच राहणार असून शिक्षकच विद्यार्थ्याना संस्कार,मूल्ये आणि दिशा देणारे खरे मार्गदर्शक असल्याचे असे प्रतिपादन ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक हेमंत कुमार नंदा यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त दि ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रेंज हिल्स हायस्कूल येथे ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे ज्ञान देणे पुरेसे नसून शिस्त, संस्कार, मूल्ये, आत्मविश्वास, कौशल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे मोठे काम शिक्षकांना करावे लागणार आहे, असे नंदा यांनी नमूद केले.
यावेळी उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाबद्दल एस. एम. जोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा कमलाकर, प्रा.डॉ.प्राची साळवे, सुलभा गायकवाड आणि शशिकांत तीकोटे यांना ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, आयआयएम जम्मूचे अध्यक्ष व डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे होते. ॲम्युनिशन फॅक्टरीचे व्यवस्थापक नितीश द्विवेदी, संस्थेचे सचिव गौतम भोसले, सहसचिव राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप,विश्वस्त प्रकाश वनशिव, मुख्याध्यापिका अश्विनी राऊत ,मुख्याध्यापिका अमृता ग्रोव्हर,मुख्याध्यापक सोमनाथ बोभाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘पुस्तक नव्हे, विचारांची भेट’
डॉ. मिलिंद कांबळे यांनी केळुसकर गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी गुरु-शिष्य नात्याचा विशेष उल्लेख केला. केळुसकर गुरुजींनी तरुण भीमरावांची बुद्धिमत्ता आणि क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांनी लिहिलेले भगवान गौतम बुद्धांचे चरित्र डॉ. आंबेडकरांना भेट दिले.
“ती केवळ एका पुस्तकाची भेट नव्हती, तर एका विचाराची भेट होती. शिक्षकाचा विश्वास आणि मार्गदर्शन विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते,” असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
रेंज हिल्स हायस्कूलला शैक्षणिक गुणवत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास, उद्योजकता, क्रीडा आणि मूल्यशिक्षण यांचा संगम असलेली भविष्यासाठी सज्ज आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment