प्रभाकर फाउंडेशनतर्फे डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरवसंगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर
प्रभाकर फाउंडेशनतर्फे डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव
संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर
पुणे : संगीत ही एक आराधना आहे. संगीत ही आत्म्याशी संवाद साधणारी कला असून ते जीवनातले एक अखंड काव्य आहे. ज्याला तानसेन होता आले नाही त्याला निदान कानसेन होता आले पाहिजे. संगीताची आराधना प्रत्येकाने करावी, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. डॉ. सलील कुलकर्णी यांचे सांगितीक क्षेत्रातील कार्य मोलाचे असून त्यांच्या सर्जनशीलतेत भावपूर्णता आढळते असेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभाकर फाउंडेशनतर्फे पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी (दि. २०) गौरव करण्यात आला. त्यावेळी जावडेकर बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात प्रभाकर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, कार्यक्रमाच्या निमंत्रक नगरसेविका ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी, आमदार सुनील कर्जतकर, उद्योजक प्रविण बढेकर, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, अजित कुलकर्णी, जगन्नाथ कुलकर्णी मंचावर होते. पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रभाकर फाउंडेशनच्या कार्याचा शुभारंभ आणि बोधचिन्हाचे अनावरण या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, महान संगीतकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे सुंदर सांगितीक वारसा प्रवाहीत होत असल्याचे जाणवते. यशवंत देव उत्कृष्ट संगीतकार, कवीच नव्हते तर ते एक उत्तम संवादकही होते. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान ‘देव तुझ्या पाठीशी आहेत’ असा आशीर्वाद त्यांनी दिला होता हे आजही माझ्या स्मरणात आहे. आज सांगितीक क्षेत्रात थोर कलाकारांच्या आठवणींसह अवितरपणे वाटचाल सुरू आहे. अशा स्वरूपाचे पुरस्कार पुन्हा एकदा नवी उमेद निर्माण करतात.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांनी प्रतिष्ठानच्या स्थापनेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, प्रभाकर फाउंडेशनाच्या माध्यमातून तेजपूर्ण हात सातत्याने कार्यरत राहतील आणि अनेक कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्य या मंचावरून समाजासमोर आणले जाईल.
आमदार सुनील कर्जतकर यांनी फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. अभय गोखले यांनी सूत्रसंचालन केले तर ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी आभार मानले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त संगीतकार यशवंत देव यांच्या गीतांवर आधारित ‘देवगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देव यांनी संगीतबद्ध केलेली गीते जितेंद्र अभ्यंकर आणि रश्मी मोघे सादर केली. केदार परांजपे, डॉ. राजेंद्र दूरकर, राजेंद्र साळुंखे, समीर बंकापुरे, नरेंद्र चिपळूणकर यांनी साथसंगत केली तर स्नेहल दामले यांचे निवेदन होते. संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.
Comments
Post a Comment