बालगोपाळांनी फोडली अनोखी 'सायकल दहीहंडी'*- जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना ३०० मोफत सायकल वाटप
*सणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा: महापौर*
*बालगोपाळांनी फोडली अनोखी 'सायकल दहीहंडी'*
- जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना ३०० मोफत सायकल वाटप
पुणे : "उत्सव हे सर्वांनी एकत्र येत आनंद घेण्यासाठी असतात. सणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपायला हवा. समाजातील सगळ्या घटकांना एकत्र घेत आपण सण साजरे करण्याची परंपरा जपावी," असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले. राधे राधे... श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी... हाथी घोडा पाल की, जय कन्हैयालाल की... गोपालकृष्ण भगवान की जय... याचा जयघोष करत ढोलताशाच्या गजरात बालगोपाळांनी अनोखी अशी सायकल दहीहंडी फोडली.
जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्या संयोजनातून शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचे आयोजन केले होते. या निमित्ताने आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या दुर्गम भागातील ३०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील माळीण, अवसरी बुद्रुक, शिरोली, नारायणगाव, ओझर, भीमाशंकर, शिरोली खुर्द या अतिदुर्गम गावांमधील, तसेच पुण्यातील वस्ती भागातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी व्यासपीठावर इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, अक्कलकोट राजघराण्याचे वंशज श्रीमंत मालोजीराजे तिसरे, भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. वर्षा डहाळे, नगरसेवक अविनाश बागवे, गौरव बोराडे आणि जेधे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व श्री शिव छत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष कान्होजी दयानंद जेधे, जयराज वाडेकर, उमेश सपकाळ, निरंजन सोमवंशी, साईराज नाईक, साहिल भिंगे, मंगेश कोंढरे, प्रीतम परदेशी आदी उपस्थित होते. नादब्रम्ह आणि तालचक्र ढोलपथकांनी यावेळी आपल्या वादनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
पुनीत बालन म्हणाले, "आजवर इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे पुणे, सातारा व अन्य जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित ज्ञान मिळण्यास वेळ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. यंदा या अभिनव सायकल दहीहंडीच्या माध्यमातून ३०० सायकलींचे वाटप करताना आनंद होत आहे. जेधे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून डीजेमुक्त व सामाजिक उपक्रमांनी ही दहीहंडी दरवर्षी साजरी केली जाते. अतिशय विधायक पद्धतीने सण, उत्सव साजरा करण्याची ही पद्धत भावली. ग्रामीण भागातील या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील सायकल मिळाल्याचा आनंद सुखावणारा आहे."
कान्होजी जेधे म्हणाले, "सायकल दहीहंडी ही संकल्पना राबवणारे आमचे पहिलेच मंडळ आहे. जन्माष्टमी हा बाळगोपाळांचा सण असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळेत पोहोचण्याची अडचण लक्षात घेऊन आम्ही दहीहंडी हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरे करायचे ठरवले. सायकल दहीहंडीचे हे तिसरे वर्ष असून, यंदा ३०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत जाण्यासाठी दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला."
Comments
Post a Comment