रुग्णवाहिकांची अखंड सेवा२३ रुग्णवाहिकांद्वारे २४ तास सेवा; १,७९८ भाविकांवर घटनास्थळी उपचार, १६७ रुग्ण रुग्णालयात रेफर


पुणे, २६ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहर आणि जिल्ह्यातील लाखो भाविकांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, आम्ही पुणेकर संस्था आणि श्री गजलक्ष्मी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुमित एस.एस. जीं १०८’ या उपक्रमांतर्गत मोफत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या कालावधीत २३ रुग्णवाहिका २४ तास सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
पुणे शहरात एकूण १८ रुग्णवाहिका, तर पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्रांपैकी थेऊर, मोरगाव, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका अशा एकूण २३ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
या विशेष वैद्यकीय सेवेसाठी २६ डॉक्टर, २६ ड्रायव्हर्स आणि ऑपरेशनल स्टाफ, असा सुमारे ५७ ते ५८ जणांचा मनुष्यबळाचा ताफा कार्यरत होता. गणेशोत्सवाच्या गर्दीत भाविकांना अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यांना घटनास्थळीच तत्काळ उपचार मिळावेत आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करता यावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
१४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १०८ रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून तब्बल १,७९८ भाविकांना घटनास्थळी प्राथमिक उपचार (On-Scene Treatment) देण्यात आले. त्यापैकी १६७ आपत्कालीन रुग्णांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या कालावधीत पाय घसरून पडणे, थकवा, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास, डिहायड्रेशन, मद्यपानामुळे उद्भवलेल्या वैद्यकीय समस्या, छातीत दुखणे तसेच कार्डियाक अरेस्ट यांसारख्या विविध वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये १०८ च्या डॉक्टर व वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार केले.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरासह अष्टविनायक क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर २४ तास सज्ज असलेल्या रुग्णवाहिका, प्रशिक्षित डॉक्टर, ड्रायव्हर्स आणि ऑपरेशनल टीम यांच्या समन्वयातून अनेक भाविकांना वेळेत प्राथमिक वैद्यकीय मदत मिळाली. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना परिस्थितीनुसार पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
‘सुमित एस.एस. १०८’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेली ही मोफत रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा गणेशोत्सव काळातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेले नियोजन आणि विविध संस्थांच्या समन्वयाचे या उपक्रमातून दर्शन घडले

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*