गणरायाच्या दर्शनासोबत ‘पुण्याची नवी सांस्कृतिक ओळख’! मानाचा पहिला कसबा गणपती : ‘परंपरा १३४ वर्षांची, उत्सव मात्र नव्या रूपाचा’
गणरायाच्या दर्शनासोबत ‘पुण्याची नवी सांस्कृतिक ओळख’!
मानाचा पहिला कसबा गणपती : ‘परंपरा १३४ वर्षांची, उत्सव मात्र नव्या रूपाचा’
पुणे : ढोल-ताशांचा निनाद, मंत्रोच्चारांनी भारलेले वातावरण, भक्तिमय आरत्या आणि गणरायाच्या दर्शनासाठी लागलेली रांग… अशा पारंपरिक वातावरणात यंदा मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पुणेकर कला, संस्कृती आणि आधुनिक पुण्याची स्पंदने अनुभवत आहेत. १३४ वर्षांची परंपरा जपत, काळाबरोबर बदलणाऱ्या पुण्याचा चेहराही आपल्या उत्सवात सामावून घेणारा यंदाचा कार्यक्रमांचा नजराणा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
वाराणसीची गंगा आरती..
गणरायाच्या दर्शनानंतर वाराणसीच्या घाटांवरील आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव यंदा कसबा गणपतीच्या उत्सवात मिळत आहे. वाराणसीमध्ये प्रत्यक्ष गंगा आरती करणाऱ्या व्यक्तींकडून गंगा आरती सादर केली जाते. दीपांच्या प्रकाशात, मंत्रघोषात आणि भक्तिमय वातावरणात होणारी ही आरती गणेशोत्सवातील एक अविस्मरणीय अनुभूती ठरला आहे.
हिंजवडीच्या ‘आयटी’ विश्वाची गणरायाच्या चरणी दिंडी..
पुण्याच्या बदलत्या ओळखीचे प्रतीक असलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचाही यंदाच्या उत्सवात आगळा सहभाग आहे. हिंजवडीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत ज्येष्ठ सॉफ्टवेअर व्यावसायिकांची ‘आयटी दिंडी’ हा त्यातील विशेष आकर्षणाचा कार्यक्रम ठरला आहे. लॅपटॉप, कोडिंग आणि कॉर्पोरेट जगतात रमणारे हे तंत्रज्ञ गणरायाच्या चरणी पारंपरिक दिंडीच्या रूपाने सहभागी झाले होते. पुण्याच्या जुन्या सांस्कृतिक मुळांचा आणि नव्या ‘आयटी पुण्या’चा हा अनोखा संगम पुणेकरांनी आवजूर्न अनुभवला.
ओडिसीच्या पदलालित्यापासून आफ्रिकन जेम्बेच्या तालापर्यंत..
यंदाच्या कार्यक्रमांमध्ये विविध कलाप्रकारांचा अनोखा मेळ पाहायला मिळत आहे. ओडिसी नृत्य, शिववंदना, आफ्रिकन जेम्बे वादन आणि कुचिपुडी नृत्य अशा कार्यक्रमांमधून भारतीय तसेच जागतिक कलाविश्वाचे रंग गणेशोत्सवाच्या मंचावर खुलत आहेत. विशेषतः आफ्रिकन जेम्बेचा जोशपूर्ण ताल आणि भारतीय शास्त्रीय नृत्यांची लय एकाच उत्सवात अनुभवायला मिळाली मिळाली आहे.
कागदावर उमटणार गणरायाचे रूप..
पुण्याच्या कलाविश्वाची वेगळी ओळख असलेल्या अर्बन स्केचर्स समूहाकडून गणरायाचे लाइव्ह स्केचिंग हा आणखी एक उपक्रम लक्षवेधी ठरला. गणेशमूर्तीसमोर बसून कलाकारांच्या कुंचल्यातून आणि रेषांमधून गणरायाचे रूप कागदावर साकारताना पाहून भक्तांमध्ये चैतन्याची लहर निर्माण झाली.
परंपरेचा सूरही तितकाच दिमाखदार..
नव्या कलाविष्कारांसोबतच कसबा गणपतीच्या उत्सवाची पारंपरिक ओळख यंदाही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. अथर्वशीर्ष, सत्यविनायक पूजा, विविध भजनी मंडळांची सेवा, कीर्तन, आरत्या, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कविसंमेलन आणि अन्य पारंपरिक कार्यक्रम उत्सवाला भक्ती आणि संस्कृतीची समृद्ध किनार मिळाली आहे. म्हणूनच कसबा गणपतीचा यंदाचा उत्सव हा केवळ ‘दर्शनाचा उत्सव’ न राहता ‘अनुभवाचा उत्सव’ ठरला आहे. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या १३४ वर्षांच्या परंपरेची हीच खासियत आहे ‘वारसा जपायचा, पण काळाबरोबर पुढेही जायचे’.
पुणे शहराच्या गेल्या काही दशकांतील विस्तारामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी या शहराच्या संस्कृतीत नवे रंग मिसळले आहेत. या नव्या पुण्याच्या सांस्कृतिक आवडी-निवडींना पारंपरिक पुण्याच्या वारशाशी जोडण्याचा प्रयत्न यंदाच्या कार्यक्रमांमधून दिसून येतो. भक्तीचा गंध, परंपरेचा वारसा, कलेची रंगत आणि आधुनिक पुण्याचा उत्साह—हे सारे एकाच ठिकाणी अनुभवता येत आहे.
Comments
Post a Comment