भारत-इटली भागीदारीतून प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाला चालना· अभिजीत डायज आणि इटलीच्या आयएनईव्हीओचा ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज’ संयुक्त उपक्रम; प्रगत मोल्ड्स, टूलिंग आणि उत्पादन तंत्रज्ञानावर भर


भारत-इटली भागीदारीतून प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाला चालना

· अभिजीत डायज आणि इटलीच्या आयएनईव्हीओचा ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज’ संयुक्त उपक्रम; प्रगत मोल्ड्स, टूलिंग आणि उत्पादन तंत्रज्ञानावर भर

पुणे : भारतातील अभिजीत डायज अँड टूल्स प्रा. लि. आणि इटलीतील आयएनईव्हीओ एस.आर.एल. यांनी ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संयुक्त उपक्रमाला औपचारिक स्वरूप दिले आहे. प्रगत मोल्ड्स, टूलिंग आणि उत्पादन तंत्रज्ञान विकसित करून त्याचे भारतात स्थानिकीकरण करणे, तसेच ऑटोमोबाईल आणि प्लास्टिक प्रक्रिया उद्योगांसाठी अत्याधुनिक उत्पादन उपाय उपलब्ध करून देणे, हा या भागीदारीचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमात अभिजीतच्या टूलिंग, अभियांत्रिकी आणि प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील चार दशकांहून अधिक अनुभवाला आयएनईव्हीओच्या उच्च अचूकतेच्या इंजेक्शन मोल्ड्स, मल्टी-मटेरियल तंत्रज्ञान आणि प्रगत पृष्ठभाग तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. 2K व मल्टी-कॉम्पोनंट मोल्ड्स, इन-मोल्ड डेकोरेशन (आयएमडी), इन-मोल्ड लेबलिंग (आयएमएल), इन-मोल्ड कोटिंग, प्रगत मोल्ड अभियांत्रिकी तसेच प्रक्रिया सिम्युलेशन यांसारख्या तंत्रज्ञानावर सुरुवातीला भर दिला जाणार आहे.

अभिजीत डायज अँड टूल्सचे संचालक अभिजीत राऊत म्हणाले, “प्रगत तंत्रज्ञान संकल्पनेपासून औद्योगिकीकरणापर्यंत नेणे, हे या भागीदारीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्राहकांना जलद विकास, जवळचे अभियांत्रिकी सहकार्य आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेसह अत्याधुनिक टूलिंग उपाय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

अभिजीत समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयामुरुगन थंगावेल म्हणाले, “आयएनईव्हीओच्या विशेष युरोपीय तंत्रज्ञानाची अभिजीतच्या अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेशी सांगड घालून भारतात प्रगत उत्पादन क्षमता विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे भारतीय तसेच जागतिक ग्राहकांसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण होईल.”

आयएनईव्हीओचे व्यवस्थापकीय संचालक – विक्री रॉबर्टो फगाराझी यांनी भारतातील वाढत्या ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर स्थानिकीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. “तंत्रज्ञान आणि गुणवत्तेशी तडजोड न करता प्रगत मोल्ड्स आणि उत्पादन तंत्रज्ञान भारताच्या जवळ आणण्याची ही महत्त्वाची संधी आहे,” असे त्यांनी सांगितले.

या भारत-इटली भागीदारीच्या प्रक्रियेत क्रिसेंडो वर्ल्डवाईडने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०२५च्या सुरुवातीपासून क्रिसेंडोने अभिजीतसोबत काम करत संभाव्य आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान भागीदारांची ओळख, संपर्क, बैठका आणि व्यावसायिक संवाद यांचा समन्वय साधला. या प्रयत्नांतून जून २०२५ मध्ये अभिजीत डायज आणि आयएनईव्हीओ यांच्यातील सामंजस्य करारासाठीही क्रिसेंडोने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ही भागीदारी पुढे जात सप्टेंबर २०२६ मध्ये ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज’ या संयुक्त उपक्रमाच्या स्थापनेपर्यंत पोहोचली.

क्रिसेंडो वर्ल्डवाईडच्या संचालक जल्पा जाधव आणि वरिष्ठ व्यवस्थापक मकरंद कोळेकर यांच्यासह संस्थेचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते. आयएनईव्हीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी कव्हर, रॉबर्टो फगाराझी, आयएनईव्हीओ जीएमबीएचचे व्यवस्थापकीय संचालक अँड्रियास पॉप, तसेच अभिजीत डायजचे संचालक निखिल राऊत आणि अभिजीत राऊत यांचीही उपस्थिती होती. इटालियन ट्रेड एजन्सीच्या नवी दिल्ली कार्यालयातील पालक सहानी यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.

अभिजीत डायजचे संचालक निखिल राऊत म्हणाले, “ही केवळ व्यावसायिक भागीदारी नसून दोन कंपन्यांच्या क्षमता, अनुभव आणि संस्कृती एकत्र आणणारे दीर्घकालीन सहकार्य आहे. ग्राहकांना मूल्य देणे आणि विश्वास निर्माण करणे, हे ‘अभिनेवो’च्या यशाचे महत्त्वाचे मापदंड असतील.”

या संयुक्त उपक्रमातून भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी प्रगत टूलिंग, मोल्ड्स आणि उत्पादन तंत्रज्ञानविषयक उपाय विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*