महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा जागर; संविधान जागर अभियानात फिल्म स्क्रीनिंग


महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा जागर; संविधान जागर अभियानात फिल्म स्क्रीनिंग

पुणे (प्रतिनिधी): संविधान जागर अभियान, पुणे यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्य आणि सत्यशोधक विचारांवर आधारित फिल्म स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य तसेच २४ सप्टेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता लोकायत हॉल येथे या फिल्म स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक विषमता, जातिभेद, अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा तसेच प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी केलेले कार्य या माध्यमातून उपस्थितांनी समजून घेतले.
“प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता यावे, समानतेने आणि न्यायाने जीवन जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानाच्या मूल्यांमध्ये पावलोपावली पाहायला मिळते. या विचारांचा आजच्या पिढीशी संवाद घडवून आणणे आणि संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही मूल्ये अधिक व्यापकपणे समजून घेणे, या उद्देशाने या फिल्म स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले,” असे उपक्रमाचे समन्वयक विशाल बागुल यांनी सांगितले.
आजच्या डिजिटल आणि सोशल मीडिया-केंद्रित वातावरणात माहितीचा वेग वाढला असला तरी चिकित्सक विचार, सामाजिक समता आणि विवेकाची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांचा सत्यशोधक दृष्टिकोन नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांवरील माहितीपत्रक वितरित करण्यात आले. तसेच या उपक्रमाचा विस्तार करत विविध सोसायट्या, शाळा आणि इतर सामाजिक संस्थांमध्येही अशा प्रकारचे फिल्म स्क्रीनिंग आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*