नाना जोशींच्या चित्रांमधील रंगसंगती तजेलदार : रविमुकुलमहाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित श्रद्धांजली सभेत सुहृदांनी जागविल्या आठवणी


नाना जोशींच्या चित्रांमधील रंगसंगती तजेलदार : रविमुकुल

महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित श्रद्धांजली सभेत सुहृदांनी जागविल्या आठवणी

पुणे : नाना जोशी यांची चित्रकलेतील शैली वेगळी होती. दिनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, जी. एस. बेंद्रे यांच्या परंपरेतले ते माझ्यामते शेवटचे चित्रकार. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमधील रंगसंगती तजेलदार असायची. पोस्टर कलरचा वापर त्यांच्यासारखा दुसऱ्या कुणीच केलेला आढळून येत नाही, असे मत ज्येष्ठ चित्रकार रविमुकुल यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ चित्रकार, प्रकाशक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कोषाध्यक्ष नाना जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परितषदेतर्फे मंगळवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी रविमुकुल बोलत होते. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्रद्धांजली सभा झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, नाना जोशी यांच्या पत्नी मणी जोशी, ज्येष्ठ चिरंजीव प्रा. अनिरुद्ध जोशी, एकपात्री कलाकार व नाना जोशी यांचे पुतणे प्रभाकर निलेगावकर, संदर्भतज्ज्ञ प्रसाद भडसावळे आदी उपस्थित होते.

रविमुकुल पुढे म्हणाले, माझी चित्रे जेव्हा प्रसिद्ध होऊ लागली त्यावेळी नाना प्रकाशकांना आवर्जून सांगायचे ‘रवींद्र माझा भाचा आहे’. प्रकाशकांकडून हे जेव्हा समजायचे त्यावेळी आत्मसन्मान अधिक वाटायचा.

राजीव बर्वे म्हणाले, सुमारे १५ वर्षांपेक्षा अधिक काळ बाबा कदम यांच्या कादंबऱ्या, नाना जोशी यांची त्यावरील चित्रे आणि प्रकाशक म्हणून दिलीपराज प्रकाशनने साहित्यविश्वावर राज्य केले. पुस्तकांवर नाना जोशी यांची चित्रे असावीत यासाठी अनेक लेखक त्या काळी आग्रही असायचे. नानांनी चित्रे काढणे थांबविले त्या वेळपासून चित्रे पाहून कादंबऱ्यांची विक्री होण्याचा काळ थांबला.

प्रसाद भडसावळे म्हणाले, नाना जोशी एक व्रतस्थ कलाकार होते. काही माणसे आपल्या आयुष्यात फार काळ नसतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप मात्र कायमची राहते. नाना जोशी यांच्या निधनाची बातमी समजली आणि एक कलानिष्ठ, साहित्यप्रेमी, जिद्द आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेला आपला माणूस हरवल्याची जाणीव झाली. नाना जोशी यांचे मोठेपण केवळ हजारो मुखपृष्ठे रेखाटण्यात किंवा अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात नव्हता तर कलेवरची निष्ठा, साहित्याची जाण, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि माणसांशी जपलेली आपुलकी यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खरे मोठेपण सामावले होते.

डॉ. स्वाती महाळंक म्हणाल्या, नाना जोशी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या व्यक्तिमत्वाचा, सर्जनशीलतेचा ठसा उमटविला होता. त्यांच्या योगदानामुळे परिषदेची वाटचाल अव्याहतपणे सुरू आहे. भाषेच्या व्याकरणाबाबत त्यांची असलेली तळमळही पहायला मिळाली आहे.

प्रभाकर निलेगावकर म्हणाले, कलाकार हा देवाने निवडून पाठवलेला माणूस असतो. देव त्याच्याकडून ती कला समाजाला देतो. १९५५ साली नाना पुण्यात आले. त्यांनी चित्रे काढायला सुरुवात केली. ते स्वयंभू चित्रकार होते. कुठल्याही चित्रकला शाळा किंवा कॉलेजमध्ये ते शिकले नाहीत.

प्रा. अनिरुद्ध जोशी यांनी वडिलांच्या कलेविषयी मनोगत व्यक्त केले. प्रकाशक अनिल मेहता यांचा संदेश प्रदीप निफाडकर यांनी वाचून दाखविला. प्रकाशन क्षेत्रात नाना जोशी यांचे कार्य खूप मोठे होते, पण त्यांच्या कार्याचा सन्मान झाला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुनील महाजन म्हणाले, नाना जोशी हे केवळ एक कुशल चित्रकार नव्हते तर कला, वाङ्‌मय आणि संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास असलेले रसिक होते. त्यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून आणि विविध कलात्मक उपक्रमातून कलाक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*