*पुण्याच्या गणेशोत्सवात १०० मंडळांनी केली व्यसनमुक्ती जनजागृती चळवळ*जय गणेश व्यासपीठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा उपक्रम
*पुण्याच्या गणेशोत्सवात १०० मंडळांनी केली व्यसनमुक्ती जनजागृती चळवळ*
जय गणेश व्यासपीठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा उपक्रम
पुणे : संयम ठेवा नशेला दूर करा, यशाच्या वाटेवर पुढे चला... स्क्रीनमध्ये हरवू नका, खऱ्या जगापासून दुरावू नका... असा संदेश देणारे फलक यंदाच्या गणेशोत्सवात पुणे आणि परिसरातील तब्बल १०० गणेशोत्सव मंडळांनी लावले आहेत. मंडळाच्या उत्सव मंडपात व आजूबाजूच्या परिसरात हे फलक लावून गणेशोत्सवात व्यसनमुक्तीची चळवळ उभारण्यात आली आहे.
जय गणेश व्यासपीठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये नंदकुमार राठी, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, पियुष शहा यांसह अनेकांनी पुढाकार घेतला.
अमली पदार्थांसह मोबाईल व स्क्रीन टाईम देखील वाढत असून याविषयी जनजागृती गरजेची आहे. गणेशोत्सवात विविध राज्यांतून भाविक पुण्यामध्ये येतात. त्यामुळे या ज्वलंत विषयासंदर्भात जनजागृती व्हावी, याकरिता उपनगरांतील मंडळानी देखील पुढाकार घेतला. श्री कसबा गणपती मंडळ, सुवर्णयुग तरुण मंडळ, शनी मारुती बाल गणेश मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, संयुक्त प्रसाद मंडळ, राष्ट्रीय साततोटी मंडळ, शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ, एकता मित्र मंडळ, सहकार मित्र मंडळ, साखळीपीर तालीम मंडळ, नवज्योत मित्र मंडळ येरवडा यांसह अनेक मंडळांनी जनजागृतीपर फलक लावले आहेत.
पारंपरिक प्रबोधनपर देखावे यंदा अनेक मंडळांतर्फे साकारण्यात आले आहे. तसेच सजीव देखावे देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे उत्सव मंडपाच्या दर्शनी भागात याविषयी जनजागृती करणारे फलक मंडळातर्फे लावण्यात आले आहेत. पुणे शहरातील सर्व पेठा, कॅम्प, येरवडा, हडपसर, कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, कात्रज, सहकारनगर, सिंहगड रस्ता, कोंढवा यांसह विविध भागांतील मंडळांनी मोहिमेत सहभाग घेतला आहे.
Comments
Post a Comment