ध्वनीप्रदूषण उपद्रव थांबवण्यासाठी सातत्याने वर्षभर प्रयत्न आवश्यकसमविचारी मेळाव्यातील मत; आगामी चतुर्थीला व्यापक सभा



ध्वनीप्रदूषण उपद्रव थांबवण्यासाठी सातत्याने वर्षभर प्रयत्न आवश्यक

समविचारी मेळाव्यातील मत; आगामी चतुर्थीला व्यापक सभा

पुणे : गणेशोत्सव किंवा अन्य सण उत्सवांमध्ये होणारा स्पीकर डीजे उपद्रव थांबवण्यासाठी सातत्याने वर्षभर प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी समविचारी पक्ष, संघटना आणि मंडळांचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक अनंत चतुर्दशीनंतरच्या पहिल्या चतुर्थीच्या दिवशी घेण्यात यावी असे निश्चित करण्यात आले.

 नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदिर मंडळाने स्पीकर विरोधी समिती, ध्वनी प्रदूषण विरोधी समिती तसेच विविध पक्ष संघटना, पोलीस, पत्रकार यांना 'संवाद आरती' आणि संवाद स्नेह मेळाव्यासाठी पाचारण करण्यात आले होते. 

सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, आम आदमी पार्टीचे मुकुंद कीर्दत, डीजे विरोधी आंदोलनामध्ये सहकार घेणारे सौरभ वीरकर, कम्युनिस्ट कार्यकर्ते चिंतामणी कानगो, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अशोक मेहंदळे, तुळशीबाग मंडळाचे पदाधिकारी नितीन पंडित, संघ परिवारातील राजेश मनगिरे,मुक्त पत्रकार विवेक सरपोतदार, वैद्य योगेश सरपोतदार, यशवंत बोगम हेमंत गोळे, राजेश ठोंबरे, अनिल काळे, आशिष गुंजाळ, विक्रांत पाटील, कौस्तुभ खांडेकर संदीप बर्वे, साखळीपीर मंडळाचे कार्याध्यक्ष भाई कात्रे, तसेच अ‍ॅड. शिवराज माळवदकर, शिवानी माळवदकर आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर अध्यक्षस्थानी होते. 

मेळावा सुरु होण्यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले.

वेलणकर यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुया, असे आवाहन करत सांगितले की कायद्याच्या चौकटीत उत्सव साजरा झाला तर कोणाचा आक्षेप असणार नाही. 

ढोल ताशांच्या अनेक आठवडे चालणाऱ्या सरावामुळे ही अनेक ठिकाणी त्रास होतो, अशी सामूहिक तक्रार व्यक्त करुन वेलणकर यांनी अनंत चतुर्दशीच्या परंपरेनुसार सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले पाहिजे. ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालते, त्यात अनेक वाईट गोष्टी होतात, याकडे लक्ष वेधले.

मुकुंद किर्दत म्हणाले ‘ गुलाल वापर, थर्माकोलची सजावट याबाबत गणेश मंडळे ही बदलतात. उत्सवाचा आनंद वाटावा यासाठी जाणीव जागरुकता झाली पाहिजे. ध्वनी प्रदूषण कायद्याची चौकट अनेक निकषांनी बांधली आहे. शांततेत जगणे हा मुलभूत असल्याचे न्यायालयाच्या निकालांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या विषयाला बळ मिळेल अशी एकत्र लढाई केली पाहिजे.’
 आम्ही धार्मिक आणि बुद्धीप्रामाण्यवादीही आहोत असे सांगून रविंद्र माळवदकर म्हणाले की विसर्जन मिरवणुकीला शिस्त आणायची तर एका आळीचा एकच गणपती मिरवणुकीत आणावा. पुढच्या वर्षी दुसऱ्या मंडळाला संधी द्यावी. तरच मिरवणूक लवकर संपेल.
नीतिन पंडीत यांनी उत्सव वेगवेगळ्या विषयात विभागला आहे, अशी खंत व्यक्त करत सांगितले की तातडीने बदल होत नाहीत. हुंडाबळी आदी अनेक सामाजिक प्रश्नांची तीव्रता गणेशोत्सवातील देखाव्यांमुळे कमी झाली हे लक्षात घेऊन केवळ टीका न करता सहभागी झाले पाहिजे. सर्व घटकांचे एकत्रीकरण झाले पाहिजे.

लोकांना बधीर करण्याचे कारस्थान

डीजे विरोधातली चळवळ ही ऐतिहासिक लोकचळवळ आहे. लोकमान्य टिळक आदींनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु केला साखळीपीर तालीम मंडळात एकत्र झाले आहेत. लोक या चळवळीकडे आशेने पाहत असून ती नक्की यशस्वी होईल. लोकांना बधीर करण्याचे कारस्थान यशस्वी होऊ दिले जाणार नाही.

राजेश मनगिरे यांनी सांगितले की स्पीकरच्या प्रचंड आवाजामुळे शेकडो कुटुंबे त्रस्त आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला जात असताना विद्यानंद बापट यांना मारहाण करुन अपमान केला गेल्याने नागरी भावनांचा विस्फोट झाला. त्यानंतर लोकचळवळ सुरु झाली. तरीही राष्ट्रद्रोही ताकदींचे संमेलन अशी टीका समाजकंटकांकडून होत आहे. 

सौरभ वीरकर म्हणाले ‘ ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. मंडळांनी स्वतः बदल करणे स्वागतार्ह आहे.’



विद्यानंद बापट सहभागी होणार

डीजे विरोधी आंदोलनाचे प्रणेते विद्यानंद बापट यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते‌. मात्र मुंबई येथील एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीसाठी जावे लागल्याने ते हजर राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी संयोजक रविंद्र माळवदकर यांना लेखी निरोप पाठवत दिलगिरी व्यक्त केली आणि या विषयावर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*