झारखंड आणि हरियाणा आमनेसामने; जेतेपदासाठी रंगणार महामुकाबला१६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची रंगत वाढली
झारखंड आणि हरियाणा आमनेसामने; जेतेपदासाठी रंगणार महामुकाबला
१६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची रंगत वाढली
पुणे, २२ ऑगस्ट: १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६च्या जेतेपदासाठी हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांच्यातील अंतिम लढतीसाठी मंच सज्ज झाला आहे. पिंपरी, पुणे येथील नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये दोन्ही संघ राष्ट्रीय विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत.
१२ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील आघाडीच्या कनिष्ठ महिला हॉकी संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. खडतर आणि चुरशीच्या लढतींनंतर हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांनी अंतिम फेरीत धडक मारली असून, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दोन्ही संघांमध्ये ग्रँड फायनल रंगणार आहे.
हॉकी महाराष्ट्राच्या आयोजनाखाली आणि हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
हॉकी झारखंड : जिद्द, संयम आणि शूटआउटमधील अव्वल कामगिरी
कर्णधार राजनी केरकेट्टा आणि मुख्य प्रशिक्षक विकास पंत यांच्या नेतृत्वाखाली हॉकी झारखंडने संपूर्ण स्पर्धेत संयमी, शिस्तबद्ध आणि जिद्दी खेळाचे दर्शन घडवले आहे. झारखंडने आपल्या मोहिमेची सुरुवात हॉकी चंदीगडवर ६-० असा दणदणीत विजय मिळवत केली. त्यानंतर हॉकी पंजाबचा ३-१ असा पराभव करत त्यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली.
उपांत्यपूर्व फेरीत हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाविरुद्धची लढत झारखंडसाठी खरी कसोटी ठरली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत राहिल्यानंतर झारखंडने शूटआउटमध्ये आपला संयम आणि मानसिक कणखरता दाखवत ४-३ असा विजय मिळवला.
उपांत्य फेरीत हॉकी मध्य प्रदेशविरुद्धही झारखंडला कठीण आव्हानाला सामोरे जावे लागले. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पुन्हा एकदा शूटआउटमध्ये झारखंडच्या खेळाडूंनी दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी करत २-१ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास – हॉकी झारखंड
सामना १: हॉकी झारखंड ६-० हॉकी चंदीगड
सामना २: हॉकी झारखंड ३-१ हॉकी पंजाब
उपांत्यपूर्व फेरी: हॉकी झारखंड १-१ हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा
(शूटआउटमध्ये झारखंडचा ४-३ असा विजय)
उपांत्य फेरी: हॉकी झारखंड १-१ हॉकी मध्य प्रदेश
(शूटआउटमध्ये झारखंडचा २-१ असा विजय)
सलग दोन बाद फेरीतील सामन्यांमध्ये शूटआउटचा सामना करताना दाखवलेला संयम आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता ही झारखंडच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासाची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.
हॉकी हरियाणा: आक्रमक वर्चस्वासह अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश
कर्णधार शशी खासा आणि मुख्य प्रशिक्षक आझाद सिंग मलिक यांच्या नेतृत्वाखाली हॉकी हरियाणाने संपूर्ण स्पर्धेत आक्रमकता, वेग आणि भक्कम बचाव यांचा सुरेख मिलाफ साधला आहे.
हरियाणाने आपल्या स्पर्धेची सुरुवात हॉकी बंगालवर तब्बल १०-१ असा दणदणीत विजय मिळवत केली. त्यानंतर हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाचा ३-० असा पराभव करत त्यांनी आपली विजयी लय कायम राखली.
उपांत्यपूर्व फेरीत हॉकी चंदीगडवर ३-१ असा विजय मिळवत हरियाणाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. त्यानंतर उपांत्य फेरीत छत्तीसगड हॉकीविरुद्ध हरियाणाने आणखी एक आक्रमक खेळ सादर करत तब्बल ८-० असा एकतर्फी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास – हॉकी हरियाणा
सामना १: हॉकी हरियाणा १०-१ हॉकी बंगाल
सामना २: हॉकी हरियाणा ३-० हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा
उपांत्यपूर्व फेरी: हॉकी हरियाणा ३-१ हॉकी चंदीगड
उपांत्य फेरी: हॉकी हरियाणा ८-० छत्तीसगड हॉकी
चार सामन्यांत तब्बल २४ गोल नोंदवत आणि केवळ २ गोल स्वीकारत हरियाणा अंतिम सामन्यात अत्यंत भक्कम स्थितीत दाखल झाला आहे. आता याच आक्रमक लयीत अंतिम सामन्यातही कामगिरी करून राष्ट्रीय विजेतेपदावर नाव कोरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
अपराजित दोन संघांमध्ये जेतेपदाची निर्णायक लढत
अंतिम सामना हा दोन अपराजित संघांमधील चुरशीचा संघर्ष ठरणार आहे. हरियाणाने आक्रमक आणि धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे, तर झारखंडने अत्यंत अटीतटीच्या बाद फेरीतील सामन्यांमध्ये संयम, जिद्द आणि मानसिक कणखरतेचे दर्शन घडवत अंतिम फेरी गाठली आहे.
झारखंडची धुरा राजनी केरकेट्टा, तर हरियाणाचे नेतृत्व शशी खासा करत आहेत. आता या दोन्ही कर्णधारांकडून अंतिम सामन्यात आपल्या संघाला विजेतेपदाकडे नेण्यासाठी निर्णायक नेतृत्वाची अपेक्षा आहे.
ही अजिंक्यपद स्पर्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने हॉकी महाराष्ट्रातर्फे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँक ही प्रस्तुत प्रायोजक असून युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर अस्वानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला हे सपोर्ट पार्टनर्स आहेत.
Comments
Post a Comment