डॉ. प्रभा अत्रे संगीत साहित्य-संशोधन पुरस्कार जाहीर


डॉ. प्रभा अत्रे संगीत साहित्य-संशोधन पुरस्कार जाहीर

 

पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-साहित्य पुरस्कार आणि स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-संशोधन पुरस्कार आज (दि. १७) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. पुरस्कारांची घोषणा ज्येष्ठ गायक, गुरू डॉ. विकास कशाळकर, संगीत अभ्यासक डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केली. पुरस्कारांचे यंदाचे पहिले वर्ष आहे.

किराणा घराण्याच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ज्येष्ठ गायिका, विचारवंत, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, संगीतकार आणि गुरू स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे या पुण्याच्या अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी संगीताच्या विविध पैलूंवर तसेच वर्तमानकाळातील सादरीकरणाशी संबंधित विषयांवर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. संगीत या एकाच विषयावर एकाच वेळी ११ पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे.

डॉ. प्रभाताई अत्रे असे सांगत की, “संगीत ही सादरीकरणाची कला आहे आणि सादरीकरणाला नेहमीच प्राधान्य असते. काळानुरूप होणाऱ्या बदलांचे दस्तऐवजीकरण करणारे शास्त्रही त्यानुसार विकसित होणे आवश्यक आहे. आज भारतीय संगीताला जागतिक स्तरावर मिळत असलेला विस्तार पाहता हे अधिकच महत्त्वाचे ठरते.”

डॉ. प्रभाताई अत्रे यांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि संगीत क्षेत्रातील संशोधन व दस्तऐवजीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे या वर्षीपासून ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-साहित्य पुरस्कार’ आणि ‘स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत-संशोधन पुरस्कार’ देण्यात येणार आहेत.

संगीत साहित्य पुरस्कार : प्रथम : रुपये २५ हजार : ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (मराठी) – प्रा. अंजली मालकर.

द्वितीय : रुपये २० हजार : ‘संग्राम संगीतकारांचा’ (मराठी) - माधवी नानल.

तृतीय : रुपये १५ हजार : ‘नृत्यमय जग नर्तनाचा धर्म’ (मराठी) - विदुषी शमा भाटे.

संगीत-संशोधन पुरस्कार : प्रथम : रुपये २० हजार : ‘छोटा गंधर्व - ॲन एपिटोम ऑफ क्रिएटीव्हिटी इन इंडियन म्युझिक’ (इंग्रजी) - डॉ. अर्पिता वैशंपायन

द्वितीय पुरस्कार : रु. १५ हजार : ‘संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या गायकीतील जोड राग’ (मराठी) - डॉ. पल्लवी पोटे.

तृतीय पुरस्कार : रु. १० हजार : ‘उत्तर हिंदुस्थानी संगीत में स्वरलिपि पद्धति की भूमिका एवं विकास – चिकित्सक अभ्यास’ (हिंदी): डॉ. निरजा उदय वाघ.

या पुरस्कारांसाठी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर होते. परीक्षक मंडळामध्ये डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. अंजली दाणी, डॉ. अश्विनी वळसंगकर, डॉ. चेतना पाठक आणि डॉ. अतिंद्र सरवडीकर यांचा समावेश होता.


Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*