बीएनसीएचा २७वा प्रमाणपत्र प्रदान समारंभ उत्साहात व विविध उपक्रमांनी संपन्न
बीएनसीएचा २७वा प्रमाणपत्र प्रदान समारंभ उत्साहात व विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, दि. 14 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचा (बीएनसीए) २७वा प्रमाणपत्र प्रदान समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने २०२५-२६ मध्ये विद्यावाचस्पती (पी.एचडी.), पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) आणि पदवी अभ्यासक्रम (ग्रॅजुएशन) पूर्ण करणाऱ्या सुमारे १८० विद्यार्थिनींना बीएनसीए तर्फे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात प्रमाणपत्र घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीएनसीएमधील प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य अभय कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आर्किटेक्ट सोनल संचेती, प्रभारी प्राचार्य डॉ.शुभदा कमलापूरकर, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे आणि बीएनसीएतील परीक्षा विभागाच्या प्रमूख डॉ.धरती सोटे उपस्थित होते. प्रा. प्रांजल कुदळे, प्रा. श्रुतीका भोसले, प्रा. मुक्ता गोखले आणि प्रा. सौरभ मराठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त बीएनसीए तर्फे तयार करण्यात आलेला 'मानवी बांधकाम पर्यावरण आणि त्यापलीकडे : आव्हाने आणि संधी भाग ४' (बिल्ट एनव्हायरमेंट ॲण्ड बियाँड ४ : चॅलेंजेस ॲण्ड अपॉर्च्यूनिटी) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा तपशील शोधनिबंधांचे संकलन प्रकाशन झाले. त्यावेळी या परिषदेच्या निमंत्रक डॉ. संजीवनी पेंडसे, तसेच डॉ. प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रा. सायली कुलकर्णी उपस्थित होत्या.
प्रमाणपत्र देण्याच्या समारंभाच्या निमित्ताने आर्किटेक्ट सोनल संचेती यांनी पदवीधर विद्यार्थिनींना कानमंत्र देताना सांगितले की, भविष्यात प्रश्न विचारायला संकोचू नका, हाती आलेली संधी सोडू नका, एकदम मोठी झेप घेण्याऐवजी शांत व ठामपणे छोटी कामे करा व संयम ठेवा. यातून नवे बांधकाम घडवताना स्वतःचे व्यक्तीमत्वही घडवा. आर्किटेक्चर ही सर्व कलांची जननी असल्यामुळे आपण आजवर घेतलेले शिक्षण, संशोधनाचा वापर आपल्या व्यवसाय व राष्ट्रउभारणीच्या कामातही करता येईल. यातून स्वतःच्या स्वप्नांबरोबर इतरांची स्वप्नेही पूर्ण करा.
अभय कुलकर्णी म्हणाले की, आर्किटेक्चरचे पाच वर्षांचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी त्यांच्या पालकांनी केलेली आर्थिक गुंतवणूकीचे परतफेड होण्याचा कालखंड सुरू झाला आहे. या मुलींनी पहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच्या मुहूर्तमेढीचा हा कालखंड आहे. यासाठी त्यांनी आपल्या संस्कृतीतील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा वापर भविष्यात करा. कुलकर्णी यांनी पुढील आयुष्यातील व भविष्यासाठी छोटी व मोठी आर्थिक गुंतवणूक कशी करावी याचे काही मार्गही सुचवले.
डॉ. शुभदा कमलापूरकर म्हणाल्या की, आर्किटेक्चर मधील पदवी ही नवीन आयुष्याची सीमारेषा असून या पाच वर्षांमध्ये स्वतःच्या आयुष्यात मोठा बदल झाला. आपण काय मिळवले हे तपासा. या काळात चार भिंतीच्या पलिकडे जाऊन शिकताना, संशोधन, वृंदावन सारख्या ठिकाणांना दिलेल्या शैक्षणिक भेटींमधून आलेल्या कल्पक भविष्यवेधी दृष्टीकोनाबरोबरच येत जाणारी परिपूर्णता लक्षात घ्या. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानामुळे बदलत्या जगाबरोबर स्वतःलाही अद्ययावत करा.
डॉ. धोंगडे म्हणाले की, महर्षी कर्वे यांच्या ध्येयानुसार शिक्षणाद्वारे स्त्रियांचे सबलीकरण असल्यामुळे आर्किटेक्चर मधले चांगल्या शिक्षणाचा वापर आयुष्यात करा. आर्किटेक्चर हे व्याववसायिक शिक्षण असून इतरांकडे काम करताना पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करा. त्यामध्ये बाकीच्या स्त्रियांनाही कशी संधी मिळेल हेही पहा. त्यासाठी आपल्या कामातील मूल्यविचाराचे पालन करा. यातून स्वतःचे आयुष्यही समृद्ध करा. आपली कामातील घोडदौड कायम ठेवा
प्रथम क्रमांक मिळवणारे पदवीधारकः
.. पर्यावरणीय वास्तूरचना शास्त्रात पदव्युत्तर संशोधनात प्रथम : ज्ञानेश्वरी खटावकर.
.. भूदृश्य शास्त्र वास्तु रचना शास्त्र पदव्युत्तर संशोधनात प्रथमः अनुष्का जाधव.
.. डिजिटल आर्किटेक्चर पदव्युत्तर संशोधनात प्रथम : जिज्ञासा औटी
.. पदवी परीक्षेत सर्वसाधारण प्रथम : रागेश्री मोरे
संशोधनात प्रथम
.. पर्यावरणीय आर्किटेक्चर : ज्ञानेश्वरी खटावकर
.. भूदृश्यशास्त्र आर्किटेक्चर : अनुष्का जाधव
.. डिजिटल आर्किटेक्चर : रिद्धी साळुंके
.. पदवी संशोधनात प्रथम : नंदिनी लाहोटी.
.. पी. एचडी. पदवीः नुपूर चिंचखेडे
Comments
Post a Comment