गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकनागरिकांच्या सूचना व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे महापौरांचे आश्वासन
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
नागरिकांच्या सूचना व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे महापौरांचे आश्वासन
पुणे, दि. २४ ऑगस्ट २०२६ :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने उत्सवाची पूर्वतयारी, नियोजन आणि नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्यासोबत आज पुणे महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मा. सौ. मंजुषा दीपक नागपुरे, महापौर, पुणे मा. परशुराम वाडेकर, उप महापौर, मा. श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती , मा. गणेश बिडकर, सभागृह नेते, मा. निलेश निकम, विरोधी पक्षनेते, मा. रामचंद्र कदम, पक्षनेते, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, मा. सोपान चव्हाण, पक्षनेते,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( श. प गट ), मा. नितीन गावडे, पक्षनेते शिवसेना पक्ष ( उ बा ठा गट), मा. नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, मा. धीरज घाटे, मा. संजय दराडे, पोलीस सह आयुक्त, मा. संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, पत्रकार बंधू यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीमची नियमावली, वाहतूक नियोजन, एक खिडकी योजना, गणेश विसर्जनाची वेळ वाढविणे, मंडळांना आवश्यक परवानग्या व सुविधा याबाबत विविध सूचना व मागण्या मांडल्या. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना तसेच गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मा. सौ. मंजुषा दीपक नागपुरे, महापौर, पुणे यांनी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध महत्त्वपूर्ण निर्णय व आश्वासने दिली. त्यामध्ये—
1. गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने विशेष डॉक्युमेंट्री तयार करण्यात येणार आहे.
2. गणेश मंडळांना विविध परवानग्या व आवश्यक प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्यात येणार आहे.
3. शहरातील प्रत्येक गणेश मंडळाची माहिती डिजिटल मॅपिंगद्वारे वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
4. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचे योग्य नियोजन व नियंत्रण करण्यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
5. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
6. भाविक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले.
7. महिला भाविकांच्या सुविधेसाठी ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे.
8. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना आवश्यक जाहिरात व प्रसिद्धीसंदर्भात आकाशचिन्ह विभागामार्फत कोणतेही शुल्क आकारू नये, याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
9. शहरात ‘ड्रग्समुक्त पुणे’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
10. गणेश मंडळांच्या स्थानिक पातळीवरील तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
11. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या तिकीट विक्रीदरम्यान नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी नेटवर्कची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले.
12. गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, तो अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाला अधिक गती मिळणार असून, नागरिक व गणेश मंडळांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर महानगरपालिकेचा भर राहणार आहे.
Comments
Post a Comment