राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी आयोजित “बेरोजगार हक्क एल्गार” तिरंगा टू-व्हीलर रॅलीला पुण्यात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी आयोजित “बेरोजगार हक्क एल्गार” तिरंगा टू-व्हीलर रॅली पुणे शहरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे,शहराध्यक्ष विशाल तांबे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील व गटनेते काका चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. 

महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने या ‘बेरोजगार हक्क एल्गार’ रॅली चे करण्यात आले होते. शिक्षण पूर्ण करून हातात पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न उभा आहे. वर्षानुवर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना सरकारी नोकरीच्या संधी मिळण्याऐवजी भरती प्रक्रियेतील अनागोंदी, दिरंगाई आणि अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजचा हा एल्गार केवळ एका पक्षाचे आंदोलन नसून महाराष्ट्रातील प्रत्येक बेरोजगार युवकाच्या भविष्याचा आणि त्याच्या हक्काचा आवाज आहे.आज राज्यात हजारो सरकारी पदे रिक्त असताना भरती प्रक्रिया मात्र संथ गतीने सुरू आहे. अनेकदा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होतात, युवक अर्ज करतात, त्यासाठी पैसे भरतात, महिनोन्‌महिने अभ्यास करतात; मात्र परीक्षा वेळेवर होत नाही. परीक्षा झालीच तर पेपरफुटीसारख्या गंभीर घटना समोर येतात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ येते आणि या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे निघून जातात. सरकारच्या या दिरंगाईची किंमत मात्र बेरोजगार तरुणांना आपल्या भविष्याच्या रूपाने मोजावी लागत आहे.पेपरफुटी हा केवळ परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार नाही, तर तो लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर घाला आहे. एक विद्यार्थी अनेक वर्षे अभ्यास करतो, कुटुंबाचा आर्थिक भार सहन करतो, स्पर्धा परीक्षांसाठी शहर बदलतो, महागडी पुस्तके आणि क्लासेसचा खर्च करतो आणि मोठ्या अपेक्षेने परीक्षा देतो. अशा वेळी पेपर फुटल्याची घटना समोर आली तर त्याचा केवळ एका परीक्षेवर परिणाम होत नाही, तर त्याच्या संपूर्ण करिअरवर परिणाम होतो. त्यामुळे पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच संपूर्ण परीक्षा यंत्रणा पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे",असे मत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.


यावेळी शहराध्यक्ष विशाल तांबे म्हणाली की,"आज देशातील सर्वाधिक अडचणीत असलेला घटक म्हणजे या देशाची युवाशक्ती,शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत सर्वत्र युवकांचे भविष्य अंधारात आहे.केवळ परीक्षा झाली आणि पेपरफुटी झाली नाही, तरी विद्यार्थ्यांची समस्या संपत नाही. निकाल लागण्यासाठी अनेक महिने लागतात आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही नियुक्तीपत्र मिळण्यासाठी दोन-दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांसाठी प्रत्येक वर्ष महत्त्वाचे असते. त्यांची वयोमर्यादा संपत जाते, इतर परीक्षांच्या संधी हातातून निसटतात आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होत जाते. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतरही नियुक्ती न मिळणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून हजारो युवकांच्या आयुष्याशी संबंधित गंभीर समस्या आहे.

आजचा महाराष्ट्राचा तरुण शिकलेला आहे, कष्ट करण्याची त्याची तयारी आहे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्याची इच्छा आहे. त्याला मोफत आश्वासने नकोत, तर रोजगाराच्या संधी हव्या आहेत. त्याला भाषणे नकोत, तर नियुक्तीपत्र हवे आहे. त्याला वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक नको, तर निश्चित आणि पारदर्शक भरती प्रक्रिया हवी आहे. सरकारने रोजगाराच्या प्रश्नाकडे केवळ निवडणुकीच्या काळातील आश्वासन म्हणून न पाहता राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक भवितव्याचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात उद्योग उभे राहत आहेत, नवीन प्रकल्प येत आहेत, औद्योगिक वसाहती विस्तारत आहेत; मात्र त्या विकासाचा लाभ स्थानिक युवकांना कितपत मिळतो, हा प्रश्नही या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. ज्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगांसाठी घेतल्या जातात, ज्या भागातील पाणी आणि पायाभूत सुविधा उद्योगांना उपलब्ध करून दिल्या जातात, त्या भागातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळणे हा त्यांच्या हक्काचा विषय आहे. MIDC आणि औद्योगिक परिसरांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ठोस धोरण आखले पाहिजे.

बेरोजगारीचा प्रश्न हा केवळ नोकरी मिळाली किंवा नाही इतकाच मर्यादित नाही. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असुरक्षितता वाढते, कुटुंबांवर आर्थिक ताण येतो, उच्च शिक्षण घेतल्यानंतरही भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण होते आणि अनेक वर्षांची मेहनत वाया गेल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे राज्याच्या विकासाचा खरा अर्थ तेव्हाच आहे, जेव्हा या विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील युवकांना शिक्षणानंतर सन्मानाने रोजगार मिळतो".

शहराध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले की,"राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आलेला हा ‘बेरोजगार हक्क एल्गार’ सरकारला एक स्पष्ट संदेश देणारा आहे की, महाराष्ट्रातील युवकांच्या भविष्याशी आता खेळ चालणार नाही. रिक्त पदांची भरती तातडीने झाली पाहिजे, परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत, पेपरफुटीला कायमचा आळा बसला पाहिजे, निकाल वेळेत लागले पाहिजेत आणि निकालानंतर पात्र उमेदवारांना विलंब न करता नियुक्तीपत्र मिळाले पाहिजे. सरकारी यंत्रणेतील प्रत्येक टप्प्याला निश्चित कालमर्यादा असली पाहिजे आणि त्या कालमर्यादेचे पालन न करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

आज रस्त्यावर उतरलेला प्रत्येक युवक सरकारविरोधातील केवळ घोषणाबाजी करण्यासाठी आलेला नाही; तो आपल्या कष्टाचा हक्क मागण्यासाठी आला आहे. त्याच्या हातातील पदवी ही त्याच्या मेहनतीची साक्ष आहे आणि त्याच्या डोळ्यातील स्वप्न हे महाराष्ट्राच्या भवितव्याचे स्वप्न आहे. त्यामुळे या युवकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने तातडीने संवाद साधून भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत".
राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून सुरू झालेल्या या मोटरसायकल रॅली मध्ये मोठ्या संख्येने युवक विरोधी सहभागी होत "रोजगार नाही उपकार,तो आमचा अधिकार" ,"भारत सरकार जागे व्हा" ,"कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही" , अशा घोषणांनी ही राहिली जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या रॅली प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, 
जेष्ठ नेते अंकुश काकडे,पश्चिम अध्यक्ष विशाल तांबे, पूर्व अध्यक्ष श्रीकांत पाटील, गटनेते काका चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे, युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवती प्रदेशाध्यक्ष (शहरी विभाग) मनाली भिलारे,सामाजिक न्याय प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, किशोर कांबळे,भगवानराव साळुंखे,इम्रान शेख, भारती शेवाळे, स्वाती पोकळे, ज्योती निंबाळकर, अमृता कालदाते, श्रद्धा जाधव, विक्रांत पाटील,शशिकांत तापकीर, अजिंक्य पालकर, निलेश वरे यांसह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*