स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी : कौशल इनामदारदि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आयोजित अमृतप्रभा समूह गीत गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी : कौशल इनामदार
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आयोजित अमृतप्रभा समूह गीत गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे : स्पर्धेत भाग घेणे हा कुठल्याही स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे. स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठी नसते तर शिकण्यासाठी, काहीतरी वेगळे ऐकण्यासाठी असते. स्पर्धेचा मंच हा एकमेव असा मंच आहे की, जो तुम्हाला चुकण्याची मुभा देतो. त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत तुम्ही जिंकता का, जिंकत नाही हा प्रश्न दुय्यम आहे तर स्पर्धेत भाग घेणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी केले. स्पर्धेत भाग घेताना तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही आणि तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच आहे, अशी भावना असावी. स्पर्धकाने आपआपला ध्रुवतारा निर्माण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय अमृतप्रभा समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार पेठेतील अत्रे प्रशालेच्या सभागृहात आज (दि. ८) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कौशल इनामदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, मानद सचिव प्रफुल्ल निकम, परीक्षक डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे, मकरंद केळकर, स्पर्धेचे संयोजक प्रसाद भडसावळे मंचावर होते.
या स्पर्धेत ७० शाळांमधील सुमारे ९०० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘वंदे मातरम्’ला १५१ वर्षे झाल्यानिमित्त स्पर्धकांनी
‘वंदे मातरम्’ हे शब्द अंतर्भूत असलेल्या गीतांचे सादरीकरण करावे असा स्पर्धेचा निकष होता.
कौशल इनामदार पुढे म्हणाले, गाणे हे केवळ मनोरंजन करण्याचे साधन नसून ते एक प्रेरणादायक माध्यम आहे. स्पर्धेत गाताना वेगळेपणाचा अट्टाहास न धरता इतरांच्या सुरात सूर मिसळत समन्वय साधण्याची वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते तसेच आयुष्याला शिस्त लागण्यातही मदत होते. गाणे आयुष्याल फक्त अर्थच देत नाही तर मातृभाषेची आवड निर्माण करत समाज, संस्कृती, भाषा टिकविण्यासाठी उपयुक्त ठरते.
परीक्षकांच्या वतीने बोलताना डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थी तसेच पालकांना काही उपयुक्त सूचना केल्या. संजीव महाजन यांनी स्पर्धेविषयी आणि संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रफुल्ल निकम आणि मिलिंद सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
पाचवी ते सातवी : प्रथम - एसपीएम इंग्लिश स्कूल, द्वितीय – शेठ आर. एन. शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, तृतीय – परांजपे विद्या मंदिर, महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, उत्तेजनार्थ – आर्यन वर्ल्ड स्कूल, सह्याद्री नॅशनल स्कूल.
आठवी ते दहावी : प्रथम – परांजपे विद्या मंदिर, द्वितीय – एंजल हायस्कूल कदमवाक वस्ती, तृतीय – महिलाश्रम हायस्कूल, उत्तेजनार्थ – माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय, जयवंत पब्लिक स्कूल हडपसर, डॉ. जी. जी. शहा इंग्लिश मीडियम हायस्कूल.
कनिष्ठ महाविद्यालय : प्रथम – एसएनडीटी कला व वाणिज्य महाविद्यालय, द्वितीय – एच.एच.सी.पी. हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज.
Comments
Post a Comment