कारगिल, जम्मू, अयोध्या व राजस्थानसह सीमावर्ती भागात सैनिक करणार 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना


*कारगिल, जम्मू, अयोध्या व राजस्थानसह सीमावर्ती भागात सैनिक करणार 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना*
 
लष्करातील विविध तुकडयांसाठी श्रीं च्या प्रतिकात्मक मूर्ती पुण्यातून रवाना ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चा पुढाकार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणाऱ्या सैनिक गणेश भक्तांसाठी कारगिल, जम्मू, अयोध्या व राजस्थानसह सीमावर्ती भागात श्रीं च्या प्रतिकात्मक मूर्ती देण्यात आल्या. नुकत्याच या तुकड्यांच्या सैनिकांना या मूर्ती मंदिरात सुपूर्द करण्यात आल्या असून देशाच्या सीमावर्ती भागात रवाना झाल्या आहेत. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारतीय लष्करातील २४, ५, १९, १ मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटच्या सैनिकांना मूर्ती देण्यात आल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये गणेशोत्सवात सहभागी होण्यास येता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा देखील भारतीय लष्करातील मराठा लाइट इन्फन्ट्री युनिटचे सैनिक कारगिल, जम्मू, अयोध्या आणि राजस्थानसह देशात विविध सीमावर्ती भागात गणेशोत्सवात श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करणार आहेत. 
 
सीमावर्ती भागात दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा या बटालियनच्या सैनिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. सलग १६ वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
 
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सिमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने सैनिकांना वेगळी ऊर्जा मिळते. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते. 

यंदा ट्रस्टतर्फे लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत. सीमावर्ती भागात देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील सैनिकांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*