सिद्धिविनायका, आता तरी पावशील का? स्वच्छता ज्याला म्हणतात ते दाखवशील का?”**स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला औंध परिसरातील अस्वच्छतेचा नगरसेवक सनी निम्हण यांच्याकडून पर्दाफाश*

*“सिद्धिविनायका, आता तरी पावशील का? स्वच्छता ज्याला म्हणतात ते दाखवशील का?”*

*स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला औंध परिसरातील अस्वच्छतेचा नगरसेवक सनी निम्हण यांच्याकडून पर्दाफाश*

पुणे : औंध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचरा, अस्वच्छता आणि सफाई व्यवस्थेतील अनास्थेबाबत वारंवार आवाज उठवूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. विशेष म्हणजे, सफाई व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिकेने दि. १ ऑगस्टपासून सिद्धिविनायक संस्थेला तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर सफाईचे काम सोपविले आहे. मात्र काम सुरू होऊन काही दिवसांतच परिसरात पुन्हा अस्वच्छता दिसून येत असल्याने या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

औंध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचऱ्याची समस्या तसेच सफाई कामगार व संबंधित अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत स्व अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत आपण ठामपणे आवाज उठवला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बाह्य संस्थेच्या माध्यमातून सफाई व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला.

प्रायोगिक तत्त्वावर काम देण्याचा उद्देश संबंधित संस्थेला आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी देणे हा आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि शिस्तबद्ध परिसर मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत दिसत आहे. संस्थेने कामाची सुरुवातच प्रभावी पद्धतीने केली नाही, तर पुढील तीन महिन्यांत अपेक्षित परिणाम कसा साध्य होणार, असा सवाल नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी उपस्थित केला आहे.

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तब्बल ९०० सफाई कामगारांची नियुक्ती असल्याचे सांगण्यात येते. एवढे मोठे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही परिसरात कचरा आणि अस्वच्छता कायम राहत असेल, तर समस्या नेमकी कुठे आहे—मनुष्यबळात, नियोजनात की प्रशासनाच्या नियंत्रणात? याचे स्पष्ट उत्तर महापालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी निम्हण यांनी केली.

महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता “सांगूनही कामगार ऐकत नाहीत”, “काम वेळेवर होत नाही”, “आमच्याकडे अधिकार नाहीत”, “एक महिन्यानंतर दंडात्मक कारवाई करता येईल” अशा स्वरूपाच्या सबबी पुढे केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

“जर बाह्य संस्था नियुक्त करूनही नागरिकांना जुन्याच समस्या आणि त्याच अस्वच्छतेचा सामना करावा लागणार असेल, तर नागरिकांच्या पैशातून ही व्यवस्था उभी करण्याचा नेमका फायदा काय?” असा थेट सवाल सनी निम्हण यांनी केला.

महापालिका प्रशासनाकडे प्रमुख मागण्या

• सिद्धिविनायक संस्थेच्या कामाची तातडीने पाहणी करून कार्यक्षमतेचे मूल्यांकन करावे.
• संबंधित संस्थेकडून स्पष्ट लेखी कार्यआराखडा व जबाबदारीची हमी घ्यावी.
• महापालिका आणि संस्थेमध्ये प्रभावी समन्वय व नियंत्रण यंत्रणा निर्माण करावी.
• कामात कसूर झाल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट अधिकार महापालिकेकडे असावेत.
• केवळ सफाई कामगारांची संख्या न पाहता प्रत्यक्ष परिसरातील स्वच्छतेच्या गुणवत्तेवर कामगिरीचे मूल्यांकन करावे.
• नागरिकांच्या करातून होणाऱ्या खर्चाचा योग्य वापर होतो आहे की नाही, याची प्रशासनाने खात्री करावी.

ही परिस्थिती सध्या विशेषतः औंध-बोपोडी प्रभागात निदर्शनास येत आहे. मात्र शहरातील इतर भागांमध्येही अशीच परिस्थिती आहे का, याची महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करावी, अशी मागणीही निम्हण यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*